

पुणे, ता. २२ : शहरातील महागड्या खासगी प्रशिक्षण संस्थांऐवजी आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच जेईई आणि नीट या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांची तयारी करता येणार आहे. शिरूर तालुक्यातील वसेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत या परीक्षांच्या अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद पुणे आणि ‘गिव्हवाइज इंडिया फाउंडेशन’ यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या उपक्रमाचे उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक मार्गदर्शन गावातच मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जेईई आणि नीटच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना विषयातील मूलभूत संकल्पना, प्रश्नसंच, नियमित सराव, चाचण्या, शंका निरसन आणि परीक्षेच्या स्वरूपानुसार अभ्यासाचे नियोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करण्यावरही भर दिला जाणार आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मोनिका हरगुडे, मुख्याध्यापक संतोष गोसावी, ‘गिव्हवाइज इंडिया फाउंडेशन’च्या श्वेता भारती, आलोक शुक्ला, शुभम मिश्रा, दीपिका ठाकूर आदी उपस्थित होते.
पहिलीच बारावीपर्यंतची शाळा
वसेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा बारावीपर्यंत शिक्षण देणारी जिल्हा परिषदेअंतर्गत पहिली शाळा ठरणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. प्राथमिक शिक्षणापासून उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंतची सुविधा असलेल्या याच शाळेत आता जेईई आणि नीटच्या तयारीची सुविधाही उपलब्ध झाली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्षमता मोठी आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक संधी उपलब्ध झाल्यास ते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये नक्कीच सहभागी होऊ शकतात. वसेवाडी येथे सुरू झालेल्या जेईई आणि नीटच्या मोफत अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना नियमित आणि सातत्यपूर्ण उपयोग होईल. उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून विद्यार्थ्यांची भविष्यातील ध्येयांच्या दिशेने वाटचाल होईल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.