अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार?

युवकांना चांगली दिशा देणारे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे प्राध्यापक विद्यापीठात हवे आहेत ना ?... की समाजात दुही पसरविण्यास प्रोत्साहन देणारे, समाजाच्या आदर्शांची खिल्ली उडविणारे हवेत?... अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांना चुकीची दिशा दाखविणाऱ्यांचा सर्वांनीच निषेध करायला पाहिजे..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्रsakal

युवकांना चांगली दिशा देणारे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे प्राध्यापक विद्यापीठात हवे आहेत ना ?... की समाजात दुही पसरविण्यास प्रोत्साहन देणारे, समाजाच्या आदर्शांची खिल्ली उडविणारे हवेत?... अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांना चुकीची दिशा दाखविणाऱ्यांचा सर्वांनीच निषेध करायला पाहिजे.

-डॉ. अपर्णा लळिंगकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे शुक्रवारी रात्री तीन नाटके/प्रहसने सादर केली गेली. त्यात ‘जब वुई मेट’ या नाटकाच्या सादरीकरणात ‘रामलीला’, ‘रामायण’यातील काही संदर्भ, रामायणातील पात्रे, त्यांची नावे आणि वेषभूषा हे वापरून ‘रामलीले’च्या बॅक स्टेजवर ते कलाकार कसे वागतात याचे नाट्यीकरण दाखवले. त्यात आक्षेपार्ह वर्तन आणि अश्लील भाषा वापरली गेली. त्यामुळे ‘अभाविप’ने आक्षेप घेतला. पण ही नाटके कुठल्यातरी प्रात्यक्षिकाचा भाग होती असे विद्यापीठातून सांगण्यात आले. त्यामुळे तिथे विभागप्रमुखही उपस्थित होते.

दुसरीकडे अशा प्रकारचा आक्षेप ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’वर घाला आहे, असा दावा सादरकर्त्यांकडून करण्यात आला. एक सुजाण नागरिक, भारतीय संस्कृतीची समर्थक, अभ्यासक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा सदस्य या नात्याने काही प्रश्न उपस्थित करता येतील. या माध्यमातून पुढच्या पिढ्यांना कोणती आणि काय दिशा द्यायची? आणि कशाचे समर्थन करावयाचे, याचा समाजात सर्वंकष विचार होईल, अशी अपेक्षा.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व्याख्येत मत मुक्तपणे मांडण्याचा अधिकार दिला, त्याचबरोबर या मुक्तपणाला काही बंधनंही समाजव्यवस्था म्हणून घातली आहेत. या बंधनांत प्रामुख्याने जाहीर टीका, मानहानी, अश्लीलता, पोर्नोग्राफी, देशद्रोह, चिथावणी, द्वेषयुक्त भाषण, गोपनीय मजकूर, प्रतिष्ठेस धक्का आदी गोष्टींचा समावेश आहे. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यात स्वैराचार अपेक्षित नाही, हे उघड आहे. ललितकला केंद्रातर्फे जी नाटके सादर केली त्यात स्वैराचार दिसतो आहे, ना की स्वातंत्र्य.

‘जब वुई मेट’ या नाटकाच्या काही भागांतील व्हिडिओत सीतामातेचा वेष परिधान केलेल्या स्त्रीच्या तोंडी असभ्य भाषा, असभ्य वर्तन करताना दाखवले आहे. अन्य पात्रांच्या तोंडी असलेले संवादही उपहास आणि विनोद दर्शविणारे होते. त्यात ‘राम भागा राम भागा’ अशा आशयाचे गीतही होते. आता प्रत्यक्षात नाटकात राम पळून जात नसून ‘रामलीले’त रामाची भूमिका करणारा मुलगा वैतागून पळून जातो, असा प्रसंग आहे. पण यावर आक्षेप घेण्यामागे काही कारणे आहेत. केंद्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत सरावाला वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निमंत्रण कशासाठी? प्रात्यक्षिक परीक्षेला वा सरावाला येताना विद्यार्थी बॅट, स्टीक्स, काठ्यांसह कसे काय येतात?

विद्यापीठासारख्या उच्च शिक्षण संस्थेच्या प्रतिष्ठेचा विचार करता अश्लील भाषा, असभ्य वर्तन आणि देव-देवतांच्या वेशभूषेत चुकीचे वर्तन दाखविणे हे कोणत्या ‘अॅकेडमिक्स’ मध्ये बसते?रिअ‍ॅलिटीच्या नावाखाली बॅक स्टेज आर्टिस्ट काय करतेय, हे दाखवताना मर्यादा पाळणार की कुणी ड्रग्ज ओढत असतील, अन्य गैरवर्तन करत असतील तर तेही दाखविणार का?

यात मुद्दे असे आहेत की, आपण सादर करत असलेली संहिता ही प्रश्न उपस्थित करणारी व आक्षेपार्ह आहे, याची कल्पना संबंधिताना होती. म्हणूनच ते लाठ्या, काठ्या, क्रिकेट बॅट्स आदीच्या तयारीने आले होते. हिंदू धर्मीयांत श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान या व्यक्तिरेखा आदर्श म्हणून डोळ्यांसमोर असतात. त्यांच्या वेशभूषेत जाणीवपूर्वक आक्षेपार्ह गोष्टी दाखवून त्यांचा अपमान करण्याचे शिक्षण हे विद्यापीठात नाही, तर बाहेरच्या समाज विघातक शक्तीच्या प्रभावाखाली घडवून आणले जाते. अगदी कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सेन्सॉर बोर्डाच्या निकषांतून त्याला पार व्हावं लागतं. मग सीतामातेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विद्यार्थ्याच्या तोंडी अश्लील शिव्या, असभ्य वर्तन, स्मोकिंग दाखवून इतकीही आचारसंहिता पाळू नये म्हणजे कमाल आहे? हे सर्व विभागप्रमुखांच्या संमतीनेच झाल्याचे उघड आहे. त्यामुळे मा. कुलगुरू नियमाप्रमाणे कारवाई करतीलच, पण एक समाज म्हणून पुढील गोष्टींचा विचार करू शकतो का?

बी. आर. चोप्रा. यांच्या महाभारत मालिकेच्या बॅकस्टेज कलाकारावरील हा किस्सा प्रेरणादायी आहे. महाभारत मालिकेत अर्जुनाची भूमिका फिरोज खान या कलाकाराने साकारली. त्यानेच सांगितलेला किस्सा. ‘महाभारत’मध्ये काम करायला सुरुवात केल्यावर या व्यक्तिरेखेभोवतीचे वलय, पवित्रता लक्षात आली. नंतर आपणहून सिगारेट सोडली, मद्यपान बंद केले, मांसाहारही सोडून दिला. आपण शाकाहारी बनलो, असे फिरोज खान यांनी सांगितले. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेला एवढी वर्षे झाली तरी अजूनही रामाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अरुण गोविल यांना पाहताच लोक पाया पडतात.

यातून त्या कलाकारांना रामायण, महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्यात दिलेल्या शिकवणुकीचे महत्त्व अनुभवास येते आणि पटतेदेखील. मग ललितकला केंद्राच्या लोकांना अशा गोष्टी का नाही दाखवाव्याशा वाटल्या? ज्या आक्षेपार्ह आहेत अशाच का दाखवाव्याशा वाटल्या? एक समाज म्हणून आपण समग्रपणे विचार करतो तेव्हा नियम, मर्यादा अपेक्षित असतात. त्या नियमांचे उल्लंघन हे समाजाच्या मर्यादेचे उल्लंघन असते हे लक्षात ठेवावे. ललितकला केंद्रात जे नाटक दाखवले यातून अश्लीलता, हिंदूंच्या भावनांना धक्का देणे, विद्यापीठाच्या प्रतिष्ठेस धक्का पोहोचवण्याचा उद्देश दिसतो. या गोष्टी जाणीवपूर्वक घडवल्या आहेत. याचाच अर्थ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून अभिव्यक्तीचा स्वैराचार आहे.

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आहेत.)

ती ‘मुक्त’ची संकल्पना चुकीची

आपण तरुणांसमोर चांगले आदर्श ठेवतो. त्यांनी त्यातून प्रेरणा घेऊन भविष्य घडवावं, अशी अपेक्षा. मग अशावेळी आपण दारुड्या, अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीचं उदात्तीकरण करू की सज्जन व्यक्तीरेखेचं? सीतामाता या भारतीय स्री जीवनाचा आदर्श आहेत. त्यांचा संयम, सहनशीलता, मर्यादा हे आदर्श आहेत. आपल्या संस्कृतीत द्रौपदी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांसारख्या स्त्रिया या आधुनिकता, स्त्री स्वातंत्र्य यांच्या आदर्श आहेत. अशा वेळी एखाद्या स्रीला असभ्य वर्तन करताना, शिवीगाळ करताना, सिगारेट ओढताना दाखविणे म्हणजे ती आधुनिक, मुक्त आहे, अशी संकल्पनाच चुकीची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com