हंगाम वाया गेल्याने टोमॅटो उत्पादकांची निराशा

हंगाम वाया गेल्याने टोमॅटो उत्पादकांची निराशा
Published on

रवींद्र पाटे: सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. २०: तीव्र पाणीटंचाई व वाढलेल्या तापमानाचा सामना करत या वर्षी जुन्नर, आंबेगाव, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले. मात्र जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान चार महिन्यात टोमॅटोला समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने टोमॅटो उत्पादकांचा हंगाम वाया गेला.

जानेवारी ते एप्रिल दरम्यान जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो व बाजारात ६ लाख ८० हजार ३८५ टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. टोमॅटो खरेदी विक्रीतून उपबाजारात १५ कोटी ९९ लाख ४ हजार ४९९ उलाढाल झाली. टोमॅटो क्रेटला सरासरी २३५ रुपये बाजारभाव मिळाला. या बाजारभावात शेतकऱ्यांचा जेमतेम भांडवली खर्च वसूल झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा टोमॅटोचा उन्हाळी हंगाम वाया गेला असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. आता उत्पादकांचे लक्ष जून महिन्यात पावसाळी हंगामात सुरू होणाऱ्या टोमॅटोच्या बाजारभावाकडे लागले आहे.

उन्हाळी व पावसाळी हंगामात मांडव पद्धतीने मल्चिंग, ठिबकचा वापर करून संकरित टोमॅटोची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामासाठी रब्बी हंगामात लागवड केलेल्या टोमॅटोचा तोडणी हंगाम जानेवारी ते मे दरम्यान सुरू राहतो. तर पावसाळी हंगामासाठी उन्हाळी हंगामात एप्रिल, मे दरम्यान लागवड केलेल्या टोमॅटोचा तोडणी हंगाम जूननंतर सुरू होतो. यावर्षी उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या टोमॅटोला समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही. या यामुळे टोमॅटो उत्पादकांच्या पदरी निराशा आली. यावर्षी तीव्र पाणीटंचाई तसेच तापमानात ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने टोमॅटो लवकर लाल होण्याचे व झाडे करपण्याचे प्रमाण वाढले. यामुळे उत्पादनात घट झाली.


दृष्टिक्षेपात आर्थिक गणित
- शेतकऱ्यांना प्रतिक्रेट ५० ते ६० रुपये वाहतूक, पॅकिंग व तोडणी खर्च
- टोमॅटो उत्पादनासाठी एकरी सुमारे दीड लाख रुपयांचे भांडवल
- उन्हाळी हंगामात एकरी ५०० ते ६०० क्रेट टोमॅटोचे उत्पादन निघते
- टोमॅटो क्रेटला किमान ४०० ते ५०० रुपयांचा बाजारभाव मिळाल्यास खर्च वजा जाता नफा शिल्लक राहतो.

जानेवारी
५८ हजार ४१५..... टोमॅटोच्या क्रेटची आवक
१ कोटी ९७ लाख ३१ हजार ९३७.....खरेदी विक्रीतून रुपयांची उलाढाल
१०० रुपये ते ६०० रुपये....क्रेटला (वीस किलोग्रॅम) मिळालेला बाजारभाव

फेब्रुवारी
९१ हजार ९२०..... टोमॅटोच्या क्रेटची आवक
२ कोटी ८९ लाख ८२ हजार १३५ रुपये.....खरेदी विक्रीतून रुपयांची उलाढाल
१०० रुपये ते ७०० रुपये... क्रेटला (वीस किलोग्रॅम) मिळालेला बाजारभाव


मार्च
१ लाख ७५ हजार २७० ..... टोमॅटोच्या क्रेटची आवक
३ कोटी २९ लाख ४८ हजार ८१२ रुपये.....खरेदी विक्रीतून रुपयांची उलाढाल
५० रुपये ते ३५० रुपये... क्रेटला (वीस किलोग्रॅम) मिळालेला बाजारभाव

एप्रिल
३ लाख ५५ हजार ४१० ..... टोमॅटोच्या क्रेटची आवक
७ कोटी ८२ लाख ४१ हजार ६२५ रुपये.....खरेदी विक्रीतून रुपयांची उलाढाल
५० रुपये ते ३०० रुपये... क्रेटला (वीस किलोग्रॅम) मिळालेला बाजारभाव


पावसाळी हंगाम ठरणार का लकी?
मागील वर्षी टोमॅटो उत्पादकांचा जून ते ऑगस्ट दरम्यानचा पावसाळी हंगाम लकी ठरला होता. जून २०२३ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान येथील बाजारात १६ लाख ४ हजार ७३० टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. टोमॅटो क्रेटला प्रतवारीनुसार १०० रुपये ते ३००० रुपयांच्या दरम्यान विक्रमी बाजारभाव मिळाला होता. यामुळे यावर्षी टोमॅटो उत्पादकांचे लक्ष पावसाळी हंगामाकडे लागले आहे.

यंदा कर्नाटक व गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची उत्पादन घेतले होते. यामुळे टोमॅटोला समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही. सद्यःस्थितीत त्या भागातील टोमॅटो तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे टोमॅटोला मागणी वाढली असून बाजारभावात वाढ होत आहे. लिलावात टोमॅटो क्रेटला प्रति प्रतवारीनुसार शंभर रुपये ते साडेचारशे रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला. जून महिन्यात टोमॅटोला बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे.
- संजय काळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर


05042

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com