भविष्यात संपूर्ण देशात सिंबायोसिसच्या विस्ताराचे उद्दिष्ट - मेड इन पुणे

vidya-yervadekar
vidya-yervadekar

शिक्षणक्षेत्राचा आवाका सध्या खूपच विस्तारला आहे, नवनवीन करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यानुसार वेगवेगळे कार्सेस देखील आता उपलब्ध आहेत. पारंपारिक शिक्षणाच्या पद्धतीत देखील बदल होतोय. पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राचे केंद्र असलेल्या शहरात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. याच विषयावर सिंबायोसिसच्या विद्या येरवडेकर यांच्याशी मारलेल्या गप्पा..

तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी बघता आधी वैद्यकीय क्षेत्र आणि नंतर कायद्याचे शिक्षण घेतले मग या क्षेत्राकडे कधी वळालात?
संस्थेशी माझा थेट असा संबंध नव्हता. पण, खरे सांगायचे तर घराताच याचे बाळकडू मिळाले असे म्हणायला हरकत नाही. लहानपणासापूनच अनेक विद्यार्थी आमच्या घरीच राहायला आलेले मी पाहिले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्न, समस्या हे सगळं सतत समोर होतेच. परंतु, मी वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेत असल्याने मला वेळ मिळत नव्हता. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी जेव्हा भारतात आले. त्याचदरम्यान माझ्या बाबांनी सिंबायोसिसला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यासगळ्या प्रक्रीयेमध्ये मी पण सतत त्यांच्या बरोबर होते. त्यामुळे मग इकडे वळण्याचा निर्णय घेतला. मला हे खूप चॅलेंजिंग पण वाटलं आणि आपण कोणाच्यातरी आयुष्यात एवढा सकारात्मक बदल घडवू शकतो म्हणून हे क्षेत्र खूप समाधान देणारे आहे हा देखील माझा दृष्टीकोन होता. कारण वैद्यकीय क्षेत्राचेही असेच आहे.. त्यामुळे मी या क्षेत्राकडे येण्याचा निर्णय घेतला. 

सुरुवात कशी केलीत... आणि त्यावेळी काय समस्या जाणवल्या..?
मी सुरुवात केली ती हेल्थ केअर सेंटरपासून. परंतु, त्यानंतर माझ्या लक्षात आले की मार्केटच्या मागणीचा देखील विचार करणे गरजेचे आहे. आपण आज जो कोर्स डिझाईन करु त्याला कदाचित सहा महिन्याने तेवढी डिमांड नसेलही.. मग अशा वेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. शिवाय आजकाल इंटरनेटमुळे सगळीकडे, सगळीच माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे शिकवण्याची पद्धत कशी असावी याचा देखील विचार करावा लागतो.  

शिक्षण क्षेत्रात काम करताना कोणता दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे. 
हे क्षेत्र देखील वैद्यकीय क्षेत्रासारखेच आहे. त्यामुळे सेवाभावी वृत्ती हवी. कारण एखादा विद्यार्थी आपल्याकडे शिकणार आहे म्हटल्यावर तो पुढे काय करेल, याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर देखील होणार आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. 

बदलता काळ लक्षात घेता, टेक्नॉलॉजीमुळे आज सगळीच माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. अश्या परिस्थितीत शिक्षकांची काय भूमिका असायला हवी..?
प्राध्यापकांचा रोल तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. पूर्वी जसं शिक्षक आपल्याला सगळं शिकवायचे तशी आता गरज नाही त्यांची भूमिका आता मार्गदर्शकाची असली पाहिजे. त्यासाठी आमच्याकडे 'टिचर ट्रेनिंग सेंटर्स' आहेत. अभ्यासक्रमाची रुपरेषा ठररविण्यसाठी आमच्याकडे 'क्रेडिट सिस्टिम' आहे. त्यामुळे पारंपारिक परिक्षांची पद्धत नसून, असाइन्मेंट देण्यावर आम्ही भर देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही त्यात चांगला सहभाग असतो. शिक्षकांची निवड देखील आमच्याकडे फक्त आणि फक्त गुणवत्तेवरच केली जाते. 

आपल्या संस्थेत येणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या राज्यातीलच नाही तर वेगवेगळ्या देशातील असतात त्यांना एकत्र शिकवताना अनुभव कसा असतो?
आमच्याकडचे विद्यार्थीच नाही तर, संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्यच वेगवेगळ्या प्रांतातील आहेत. मला तर वाटतं की त्यामुळे आपल्याला एकाच विषयावरचा वेगवेगळा दृष्टीकोन कळतो. तेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे. त्यांचा दृष्टीकोन तर बदलतोच शिवाय कॉलेजच्या दिवसात होणारी मैत्री ही कायमची असते असं मला वाटतं. त्यामुळे आमच्या असे लक्षात आले आहे की कित्तेक विद्यार्थी पुढे स्वत:चा व्यवसाय सुरु करताना भारतात व्यवसाय सुरु करताना आपल्या परदेशी मित्राची मदत घेतात. हे किती छान आहे. काही मुलांना जर भाषेची अडचण असेल तर त्यांच्यासाठी आमच्या संस्थेत स्वतंत्र केंद्र आहे. 

भविष्यातले प्लॅन्स काय आहेत..?
भारतात विविध राज्यात संस्थेचा विस्तार करणे हे धेय तर आहेच. परंतु, मला असं वाटतं की शाळांवर देखील लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. आजकाल लहान मुले देखील सहज टेक्नॉलॉजी वापरतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षण पद्धतीत देखील आपण याचा वापर कसा करु शकतो यावर आम्ही नवनवीन कल्पना राबवत आहोत. त्यासाठी शिक्षकांनाही तयार करणे गरजेचे आहे. लहान मुलांवर दृकश्राव्य माध्यमाचा परिणाम पटकन होतो. त्यामुळे त्याचा समावेश शिकविण्याच्या पद्धतीत आणखी वाढवणे गरजेचे आहे. 

पुण्यात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या सध्या वाढत आहे तर त्या दृष्टीने कोणते बदल अपेक्षित आहेत? 
मुंबई-पुणे या शहरांदरम्यानचा भाग हा शैक्षणिक क्षेत्राच्या विस्तारासाठी पोषक आहे. या विस्ताराठी सरकारने संशोधन करण्याची व प्रोत्साहन देण्याची गरज आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com