‘स्मार्ट’ व्यवस्थापन ः भविष्यातील गणेशोत्सवाचा नवा चेहरा

‘स्मार्ट’ व्यवस्थापन ः भविष्यातील गणेशोत्सवाचा नवा चेहरा
Published on

‘स्मार्ट’ व्यवस्थापन ः भविष्यातील गणेशोत्सवाचा नवा चेहरा


गणेशोत्सवातील तंत्रज्ञानाचा अर्थ केवळ आकर्षक डिजिटल सजावट किंवा समाज माध्यमांवरील प्रसारण एवढाच राहिलेला नाही. आता सुरक्षा, वाहतूक, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्थापन, स्वच्छता, दर्शन नियोजन आणि पर्यावरण संरक्षण अशा विविध पातळ्यांवर तंत्रज्ञानाचा विचार केला जात आहे. परंपरा कायम ठेवत आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात एआय, स्मार्ट सीसीटीव्ही, क्यूआर कोड, मोबाईल ॲप, डिजिटल दर्शन, ऑनलाइन बुकिंग, ड्रोन, डेटा विश्लेषण आणि रिअल-टाइम क्राउड मॉनिटरिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गणेशोत्सवात वाढताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातील गणेशोत्सव हा श्रद्धा आणि तंत्रज्ञान यांच्या समन्वयाचे एक प्रभावी उदाहरण ठरण्याची अपेक्षा आहे.
-----------------------
ग णेशोत्सव म्हटला की डोळ्यांसमोर उभी राहते ती आकर्षक आरास, रोषणाईने उजळलेले रस्ते, ढोल-ताशांचा गजर, भक्तांची गर्दी आणि सर्वत्र घुमणारा “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरगुती गणपतीपासून मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांपर्यंत हा उत्सव श्रद्धा, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि लोकसहभागाचे प्रतीक मानला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक सामाजिक स्वरूप दिल्यानंतर काळानुसार या उत्सवात अनेक बदल झाले. सजावट बदलली, देखावे बदलले, व्यवस्थापनाच्या पद्धती बदलल्या आणि आता तंत्रज्ञानही गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग बनू लागले आहे.
आजच्या डिजिटल युगात परंपरा कायम ठेवत आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात एआय, स्मार्ट सीसीटीव्ही, क्यूआर कोड, मोबाईल ॲप, डिजिटल दर्शन, ऑनलाइन बुकिंग, ड्रोन, डेटा विश्लेषण आणि रिअल-टाइम क्राउड मॉनिटरिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गणेशोत्सवात वाढताना दिसत आहे. विशेषतः मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये लाखो भाविकांची गर्दी सुरक्षितपणे हाताळण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत महत्त्वाची ठरत आहे. गणेशोत्सवातील तंत्रज्ञानाचा अर्थ केवळ आकर्षक डिजिटल सजावट किंवा समाज माध्यमांवरील प्रसारण एवढाच राहिलेला नाही. आता सुरक्षा, वाहतूक, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्थापन, स्वच्छता, दर्शन नियोजन आणि पर्यावरण संरक्षण अशा विविध पातळ्यांवर तंत्रज्ञानाचा विचार केला जात आहे. त्यामुळे भविष्यातील गणेशोत्सव हा श्रद्धा आणि तंत्रज्ञान यांच्या समन्वयाचे एक प्रभावी उदाहरण ठरण्याची अपेक्षा आहे.

गर्दीवर एआयची नजर
मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसमोर होणारी गर्दी ही प्रशासन आणि मंडळांच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. लोकप्रिय गणेश मंडळांच्या दर्शनासाठी काही दिवसांत लाखो भाविक येतात. विशेषतः संध्याकाळी, सुट्टीच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी काही भागांत गर्दीचा प्रचंड ताण निर्माण होतो. पूर्वी गर्दी नियंत्रणासाठी प्रामुख्याने पोलिस, स्वयंसेवक, बॅरिकेड्स आणि सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जात असे. सीसीटिव्हीमुळे नियंत्रण कक्षात दृश्ये दिसत असली तरी प्रत्येक कॅमेऱ्यावर सातत्याने मानवी लक्ष ठेवणे कठीण असते. येथेच एआय आधारित व्हिडिओ विश्लेषण (ॲनालिटिक्स) उपयोगी ठरू शकते.
एआय प्रणाली सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमधील दृश्यांचे विश्लेषण करून एखाद्या भागात गर्दी अचानक वाढत आहे का ?, लोकांची हालचाल कोणत्या दिशेने आहे ?, एखाद्या मार्गावर असामान्य अडथळा निर्माण झाला आहे का ? किंवा एखादी संशयास्पद हालचाल होत आहे का ?, याची सूचना नियंत्रण कक्षाला देऊ शकते. काही तंत्रज्ञानामध्ये बेवारस वस्तू, प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश किंवा गर्दीच्या घनतेतील अचानक बदल ओळखण्याचीही क्षमता असते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घटना घडल्यानंतर प्रतिसाद देण्याऐवजी संभाव्य समस्या लवकर ओळखून प्रतिबंधात्मक उपाय करता येणे. उदाहरणार्थ, एखाद्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी वेगाने वाढत असल्याचे लक्षात आले तर काही भाविकांना दुसऱ्या प्रवेश मार्गाकडे वळवता येऊ शकते. अतिरिक्त पोलिस किंवा स्वयंसेवक त्या ठिकाणी पाठवता येऊ शकतात.

पुण्यात एआय आधारित सुरक्षा
पुण्यात २०२५ च्या गणेशोत्सवात पोलिसांकडून एआय आधारित सीसीटिव्ही आणि डेटा-ॲनालिटिक्सचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला. फरासखाना येथील नियंत्रण कक्षाशी जोडलेल्या यंत्रणेचा गर्दी नियंत्रण आणि गुन्हे प्रतिबंधासाठी उपयोग करण्यात आला. मध्यवर्ती पुण्यातील प्रमुख गणेश मंडळे आणि विसर्जन मार्गांवर होणारी मोठी गर्दी लक्षात घेता अशा तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढते.
पुण्याचा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव नाही, तर शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. मानाचे गणपती, विविध ऐतिहासिक मंडळे आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणे शहरासह राज्याच्या विविध भागांतून भाविक येतात. त्यामुळे लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, मंडई आणि मध्यवर्ती भागांतील अनेक रस्त्यांवर गर्दीचे व्यवस्थापन करणे मोठे आव्हान ठरते. एआय आधारित प्रणालींमधून मिळणाऱ्या डेटाचा योग्य वापर केल्यास गर्दी कुठे वाढत आहे ?, कोणत्या भागात अतिरिक्त मनुष्यबळ आवश्यक आहे ? आणि कोणत्या मार्गावरील हालचाल नियंत्रित करण्याची गरज आहे ? याचा अंदाज अधिक वेगाने घेता येऊ शकतो.

मुंबईतही तंत्रज्ञानाचा वाढता वापर
मुंबईचा गणेशोत्सव हा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. लालबाग, परळ, गिरगाव, दादर यांसारख्या भागांत गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटी, दादर, जुहू आणि इतर विसर्जनस्थळांवर प्रचंड गर्दी होते. २०२५ च्या गणपती विसर्जनावेळी मुंबईतही गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. एवढ्या मोठ्या महानगरात एकाच वेळी अनेक ठिकाणी मिरवणुका, रस्त्यांवरील वाहतूक आणि विसर्जनासाठी येणारी गर्दी यांचे व्यवस्थापन करणे गुंतागुंतीचे होत असते. त्यामुळे रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देणाऱ्या प्रणाली प्रशासनासाठी उपयुक्त ठरू शकतात.

आता आणखी पुढचे पाऊल
तंत्रज्ञानाचा हा वापर आता अधिक व्यापक स्वरूप घेण्याच्या दिशेने जात आहे. २०२६ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने प्रमुख ठिकाणी एआय आधारित क्राउड मॉनिटिअरींग प्रायोगिक प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सिद्धिविनायक मंदिर, जुहू बीच, दादर बीच, गिरगाव आणि गेटवे ऑफ इंडिया यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी एआय सक्षम सीसीटिव्हीच्या मदतीने गर्दीचे रिअल-टाइम विश्लेषण करण्याचे नियोजन आहे.
या प्रणालींचा उपयोग केवळ सुरक्षा व्यवस्थेसाठीच न राहता नागरी सुविधांचे नियोजन करण्यासाठीही होऊ शकतो. एखाद्या भागांत किती लोक जमा झाले आहेत ?, कोणत्या वेळेत सर्वाधिक गर्दी होत आहे ? आणि गर्दीचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे ? याची माहिती उपलब्ध झाल्यास त्या भागांतील स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, वाहतूक आणि पोलिस बंदोबस्त यांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल. डेटाच्या आधारे निर्णय घेण्याची ही पद्धत भविष्यात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

क्यूआर कोडमुळे मंडळेही ‘स्मार्ट’
आज जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे क्यूआर कोड हा डिजिटल माहिती देण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग बनला आहे. गणेश मंडळेही आता या तंत्रज्ञानाचा वापर विविध प्रकारे करू शकतात. मंडळाच्या प्रवेशद्वारावर असलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर भाविकाला गणपतीची माहिती, मंडळाचा इतिहास, आरतीची वेळ, दर्शनाची वेळ, सामाजिक उपक्रम, देणगीविषयक अधिकृत माहिती किंवा पूजा बुकिंगसारख्या सुविधा उपलब्ध करून देता येतात.
मुंबईतील जीबीएस सेवा मंडळाने २०२५ मध्ये डायनॅमिक क्यूआर कोडस, डिजिटल किऑस्क आणि पूजा स्लॉट बुकिंगचा वापर केला. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ प्रचारासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष भाविक व्यवस्थापनासाठी कसा करता येऊ शकतो ?, याचे उदाहरण समोर आले. क्यूआर कोडचा आणखी एक फायदा म्हणजे चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी अधिकृत डिजिटल माध्यम तयार करता येते. प्रसार माध्यमांवर अनेकदा दर्शनाची वेळ, मार्ग किंवा कार्यक्रमांविषयी अपूर्ण माहिती पसरते. मंडळाचा अधिकृत क्यूआर कोड असल्यास भाविक थेट अधिकृत माहितीपर्यंत पोहोचू शकतो.

घरबसल्या डिजिटल दर्शन
कोविडनंतर डिजिटल दर्शनाची संकल्पना अधिक वेगाने पुढे आली. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, परदेशात किंवा दुसऱ्या शहरात राहणारे भाविक यांना प्रत्यक्ष मंडळात जाता येत नसले तरी ऑनलाइन लाइव्ह दर्शनामुळे गणरायाचे दर्शन घेता येते. आता या व्यवस्थेत आणखी सुधारणा होऊ शकतात. उच्च दर्जाचे लाइव्ह स्ट्रीमिंग, अनेक कॅमेऱ्यांतून दर्शन, ऑनलाइन आरती, डिजिटल पूजा नोंदणी आणि कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण अशा सुविधा वाढू शकतात. तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष दर्शनाची जागा घेतली जाईल असे नाही. उलट ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यापर्यंत उत्सव पोहोचवण्याचे ते एक अतिरिक्त माध्यम आहे.

मोबाईलवर गर्दीची माहिती ?
भविष्यात गणेशोत्सवासाठी एकात्मिक मोबाईल ॲप किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार झाल्यास भाविकांचा अनुभव मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. भाविक घरातून बाहेर पडण्यापूर्वीच एखाद्या मंडळासमोर सध्या किती गर्दी आहे ?, अपेक्षित प्रतीक्षा वेळ किती आहे ?, कोणता प्रवेशमार्ग खुला आहे?, कोणत्या मार्गावर वाहतूक कोंडी आहे?, जवळचे पार्किंग कुठे आहे ? आणि पुढील आरती किती वाजता आहे ?, अशी माहिती पाहू शकेल.
गुगल मॅप्स सारख्या डिजिटल नकाशांसोबत प्रशासन आणि मंडळांकडील रिअल-टाइम क्राउड डेटा जोडला गेला तर गर्दीचे मार्गदर्शन अधिक प्रभावी होऊ शकते. अर्थात यासाठी विविध संस्था, पोलिस, महापालिका आणि गणेश मंडळांमध्ये डेटा समन्वय आवश्यक असेल.

एआय, स्मार्ट वाहतूक व्यवस्था
गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे प्रशासनासाठी वाहतूक व्यवस्थापनाची मोठी परीक्षा असते. अनेक रस्ते बंद करावे लागतात, काही मार्गांवरील वाहतूक वळवावी लागते आणि हजारो वाहने पर्यायी मार्गांकडे पाठवावी लागतात. सीसीटिव्ही, क्राउड काउंटिंग सिस्टिम्स आणि वाहतूक सेन्सर्समधून मिळणाऱ्या डेटाचे एआयच्या मदतीने विश्लेषण केल्यास कोणत्या मार्गावर जास्त गर्दी आहे ?, कोणत्या चौकात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे ? आणि वाहतूक कोणत्या मार्गावर वळवणे योग्य ठरेल ?, याबाबत निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. ही माहिती नागरिकांपर्यंत मोबाईल ॲप, समाज माध्यमे, डिजिटल डिस्प्ले किंवा मेसेजिंग सेवांद्वारे पोहोचवता आली तर अनावश्यक वाहतूक कोंडी कमी करण्यासही मदत होऊ शकते.

मोबाइल सर्व्हेलन्स टॉवरचा प्रयोग
पुण्यात २०२६ च्या आषाढी वारीत एआय आधारित मोबाइल सर्व्हेलन्स टॉवरचा वापर करण्यात आला. या वाहनामध्ये क्राउड काउंटिंग आणि एआय आधारित निगराणीची सुविधा असून त्यामध्ये ड्रोन सम्मलित करण्याचेही नियोजन सांगण्यात आले. मोबाइल सर्व्हेलन्स यंत्रणेचा फायदा म्हणजे आवश्यकतेनुसार ती गर्दीच्या वेगवेगळ्या ठिकाणी हलवता येते. कायमस्वरूपी सीसीटिव्ही नेटवर्क नसलेल्या भागांतही तात्पुरत्या स्वरूपात निरीक्षण व्यवस्था निर्माण करता येते. गणेश विसर्जनासारख्या मोठ्या गर्दीच्या प्रसंगी अशा तंत्रज्ञानाचा उपयोग होण्याची मोठी क्षमता आहे. एखाद्या विसर्जन मार्गावर अचानक गर्दी वाढल्यास मोबाइल निगराणी यंत्रणा त्या भागात पाठवून नियंत्रण कक्षाला परिस्थितीचे अधिक स्पष्ट चित्र देता येऊ शकते.

‘आकाशातील डोळे’
मोठ्या मिरवणुका आणि गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानही महत्त्वाचे ठरू शकते. जमिनीवरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांना काही मर्यादा असतात. गर्दीच्या मध्य भागातील परिस्थिती प्रत्येक वेळी स्पष्ट दिसेलच असे नाही. ड्रोनमुळे वरून विस्तृत परिसराचे चित्र मिळू शकते. विशेषतः विसर्जन मार्ग, चौपाट्या, नदीकाठ आणि प्रमुख चौकांवरील गर्दीचा अंदाज घेण्यासाठी ड्रोन उपयुक्त ठरू शकतात. एआय आधारित विश्लेषणाशी ड्रोनचे दृश्य जोडल्यास गर्दीची घनता आणि हालचाल समजण्यास मदत होऊ शकते. मात्र, ड्रोनचा वापर करताना सुरक्षा, परवानग्या आणि नागरिकांच्या गोपनीयतेशी संबंधित नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे.

आपत्कालीन वेळेस तंत्रज्ञानाची मदत
मोठ्या गर्दीत एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडणे, लहान मूल हरवणे, चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होणे किंवा आग लागणे यांसारख्या आपत्कालीन घटना घडू शकतात. अशा वेळी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. डिजिटल नकाशावर रुग्णवाहिका, वैद्यकीय केंद्र, पोलिस मदत केंद्र आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग दर्शवता येऊ शकतात. गर्दीची रिअल-टाइम माहिती उपलब्ध असल्यास रुग्णवाहिकेला सर्वात मोकळा मार्ग निवडण्यास मदत होऊ शकते. मंडळांच्या स्वयंसेवकांनाही मोबाइल नेटवर्क किंवा स्वतंत्र डिजिटल कम्युनिकेशन प्रणालीद्वारे नियंत्रण कक्षाशी जोडल्यास माहितीचा वेग वाढू शकतो.

हरवलेल्या व्यक्तींचा शोध
गणेशोत्सवाच्या गर्दीत लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक हरवण्याच्या घटना घडतात. पारंपरिक उद्‍घोषणा पद्धतीबरोबरच केंद्रीकृत डिजिटल माहिती प्रणाली तयार केल्यास विविध मदत केंद्रांमध्ये माहिती वेगाने पोहोचवता येईल. येथे चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा संभाव्य उपयोग चर्चेत येतो. मात्र, हा विषय संवेदनशील आहे. अशा प्रणाली वापरताना कायदेशीर चौकट, अचूकता, नागरिकांची गोपनीयता, डेटाचा वापर आणि डेटा किती काळ ठेवला जाणार ? याबाबत स्पष्ट नियम आवश्यक आहेत. केवळ तंत्रज्ञान उपलब्ध आहे म्हणून त्याचा अनियंत्रित वापर करणे योग्य ठरणार नाही.

एआय चॅटबॉट - डिजिटल स्वयंसेवक?
मोठ्या गणेश मंडळांमध्ये भाविकांकडून वारंवार सारखे प्रश्न विचारले जातात - दर्शनाची वेळ काय ? आरती कधी आहे? पार्किंग कुठे आहे? जवळचे रेल्वे स्टेशन कोणते? ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे का? प्रसाद कुठे मिळेल? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भविष्यात एआय चॅटबॉट उपयोगी ठरू शकतो. मंडळाच्या वेबसाइटवर, मोबाईल ॲपमध्ये किंवा व्हॉटसॲप सारख्या माध्यमाशी जोडलेल्या प्रणालीमध्ये असा डिजिटल सहाय्यक उपलब्ध होऊ शकतो. विशेष म्हणजे तो मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये माहिती देऊ शकतो. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठीही सुविधा निर्माण होईल.
मात्र, एआय चॅटबॉटने दिलेली माहिती अधिकृत आणि अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत चुकीची माहिती गंभीर परिणाम घडवू शकते. त्यामुळे एआय सोबत मानवी नियंत्रण आणि नियमित माहिती अद्ययावत करण्याची व्यवस्था आवश्यक असेल.

डेटा सांगेल गर्दीचा पॅटर्न
एआय आणि डेटा विश्लेषणाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे पूर्वनियोजन. दरवर्षीच्या गणेशोत्सवातील गर्दीचा डेटा उपलब्ध झाल्यास कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत आणि कोणत्या भागात सर्वाधिक गर्दी होते याचे पॅटर्न समजू शकतात. उदाहरणार्थ, मागील काही वर्षांच्या आकडेवारीतून एखाद्या मंडळाकडे रात्री आठ ते अकरा या वेळेत सर्वाधिक गर्दी होत असल्याचे दिसत असेल तर पुढील वर्षी त्या वेळेत अतिरिक्त स्वयंसेवक, पोलिस बंदोबस्त, वैद्यकीय मदत आणि पाणी व्यवस्था ठेवता येईल. यालाच प्रेडिक्टिव्ह प्लॅनिंग म्हणता येईल. म्हणजे भविष्यात काय होणार ? हे अचूक सांगण्याऐवजी उपलब्ध डेटाच्या आधारे संभाव्य परिस्थितीसाठी आधीपासून तयारी करणे.

पर्यावरणासाठीही तंत्रज्ञान
गणेशोत्सवातील तंत्रज्ञान सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनापुरते मर्यादित नाही. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठीही डिजिटल माध्यमांचा उपयोग होऊ लागला आहे. ‘माय बाप्पा मातीचा’ सारख्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नैसर्गिक मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध करून देणारे स्थानिक मूर्तिकार आणि विक्रेते शोधण्यास भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात अशा ॲपच्या माध्यमातून शाडू किंवा नैसर्गिक मातीच्या मूर्तींची माहिती, कृत्रिम विसर्जन तलावांचे ठिकाण, निर्माल्य संकलन केंद्रे आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तू उपलब्ध असलेली ठिकाणेही एका नकाशावर दाखवता येऊ शकतात. यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ उत्सव ‘स्मार्ट’ करण्यासाठी नव्हे, तर अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठीही होऊ शकतो.

डिजिटल देणगी, पारदर्शक व्यवहार
यूपीआय आणि क्यूआर कोडमुळे डिजिटल व्यवहार सामान्य झाले आहेत. गणेश मंडळांमध्येही अधिकृत क्यूआर कोडच्या माध्यमातून देणगी स्वीकारण्याची व्यवस्था वाढली आहे. डिजिटल व्यवहारांमुळे रोख रकमेचे व्यवस्थापन कमी होऊ शकते आणि आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवणे सोपे होते. मात्र, येथे सायबर सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. बनावट क्यूआर कोड लावून फसवणूक होण्याचा धोका असल्याने मंडळांनी अधिकृत क्यूआर कोड स्पष्टपणे प्रदर्शित करणे आणि भाविकांनी पैसे पाठवण्यापूर्वी खात्याचे नाव तपासणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव जसजसा डिजिटल होत जाईल, तसतशी सायबर सुरक्षा ही देखील उत्सव व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग बनेल.

समाज माध्यमे आणि डिजिटल संवाद
आज गणेश मंडळांसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब आणि इतर डिजिटल माध्यमे महत्त्वाची झाली आहेत. आरतीचे लाइव्ह प्रसारण, सामाजिक उपक्रमांची माहिती, दर्शनाची वेळ आणि वाहतूक बदल यांची माहिती समाज माध्यमांतून वेगाने पोहोचवता येते. भविष्यात एआयच्या मदतीने ही माहिती अधिक वेगाने आणि विविध भाषांमध्ये तयार करता येईल. उदाहरणार्थ, प्रशासनाने एखादा मार्ग बंद केल्याची सूचना दिल्यानंतर ती मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये काही क्षणांत तयार करून भाविकांपर्यंत पोहोचवता येऊ शकते. परंतु समाज माध्यमांवर अफवा किंवा चुकीची माहिती वेगाने पसरू शकते. त्यामुळे अधिकृत खात्यांची स्पष्ट ओळख आणि पडताळलेली माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

तंत्रज्ञानासोबत गोपनीयतेचे भान
एआय आधारित सीसीटिव्ही चेहरा ओळखण्याची प्रणाली आणि डेटा ॲनालिटिक्स यांचा वापर वाढताना नागरिकांच्या गोपनीयतेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. कॅमेऱ्यांमधून गोळा होणारा डेटा कोण पाहणार? तो किती दिवस साठवला जाणार? कोणत्या कारणासाठी वापरला जाणार? तो तिसऱ्या पक्षाला दिला जाणार का? चेहरा ओळखण्याच्या प्रणालीने चुकीची व्यक्ती ओळखल्यास जबाबदारी कोणाची? अशा अनेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आवश्यक आहेत.
एआय प्रणाली शंभर टक्के अचूक नसते. प्रकाश, गर्दी, कॅमेऱ्याचा कोन आणि दृश्याची गुणवत्ता अशा अनेक घटकांमुळे त्यांची अचूकता बदलू शकते. त्यामुळे एआयने दिलेला प्रत्येक अलर्ट अंतिम सत्य मानण्याऐवजी प्रशिक्षित व्यक्तीकडून पडताळणी होणे आवश्यक आहे. एआय आणि मानवी देखरेख यांचा समतोल हा अशा व्यवस्थेचा पाया असायला हवा.

छोट्या मंडळांनाही फायदा शक्य
एआय म्हणजे केवळ मोठ्या आणि श्रीमंत गणेश मंडळांसाठी असलेले महागडे तंत्रज्ञान, अशी समजूत होऊ शकते. मात्र प्रत्येक मंडळाला अत्याधुनिक एआय कॅमेरे बसवण्याची गरज नाही.
लहान मंडळे क्यूआर कोडच्या माध्यमातून कार्यक्रम पत्रिका देऊ शकतात, डिजिटल देणगी स्वीकारू शकतात, व्हॉटसॲपवर अधिकृत माहिती देऊ शकतात, गुगल मॅप्सवर मंडळाचे अचूक स्थान नोंदवू शकतात किंवा समाज माध्यमातून दर्शनाची गर्दी आणि कार्यक्रमांची माहिती देऊ शकतात. म्हणजेच ‘स्मार्ट गणेशोत्सव’ ही केवळ मोठ्या खर्चाची संकल्पना नसून उपलब्ध तंत्रज्ञानाचा योग्य आणि गरजेनुसार वापर करण्याची कल्पना आहे.

परंपरा विरुद्ध तंत्रज्ञान नव्हे
गणेशोत्सवाच्या डिजिटल रूपाबाबत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर उत्सवाचे मूळ स्वरूप बदलण्यासाठी नसावा. गणेशोत्सवाचे केंद्र श्रद्धा, आरती, पूजा, सामाजिक एकोपा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोकसहभाग हेच राहणार आहे.
एआय आरती करू शकत नाही आणि तंत्रज्ञान भक्तीची अनुभूती निर्माण करू शकत नाही. पण आरतीसाठी येणाऱ्या हजारो भाविकांची गर्दी सुरक्षित ठेवण्यास ते मदत करू शकते. क्यूआर कोड गणपतीच्या प्रत्यक्ष दर्शनाची जागा घेणार नाही; मात्र दर्शनाची योग्य वेळ सांगून भाविकाचा त्रास कमी करू शकतो. ड्रोन उत्सवाचा भाग नसला तरी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला मदत करू शकतो. त्यामुळे प्रश्न ‘परंपरा की तंत्रज्ञान?’ असा नसून ‘परंपरेचे पावित्र्य कायम ठेवून तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा?’ असा असायला हवा.

पुढचा गणेशोत्सव कसा असेल?
काही वर्षांनंतरचा गणेशोत्सव आजपेक्षा खूप वेगळा दिसू शकतो. भाविक घरातून बाहेर पडण्यापूर्वी मोबाईलवर विविध मंडळांतील गर्दी पाहू शकेल. एआय त्याला कमी गर्दीचा मार्ग सुचवेल. पार्किंगची उपलब्धता डिजिटल नकाशावर दिसेल. मंडळाजवळ पोहोचल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यावर इतिहास, दर्शन मार्ग आणि आरतीची माहिती मिळेल.
परराज्यातून आलेल्या भाविकाला त्याच्या भाषेत एआय चॅटबॉट मार्गदर्शन करेल. नियंत्रण कक्षातील एआय प्रणाली गर्दीची घनता तपासत असेल. एखाद्या मार्गावर गर्दी वाढल्यास पोलिस आणि स्वयंसेवकांना तातडीचा अलर्ट मिळेल. ड्रोन आणि मोबाइल सर्व्हेलन्स युनिटमधून मिळणारी माहिती नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचेल.
विसर्जनाच्या वेळी डिजिटल प्रणाली वाहतुकीचे पर्यायी मार्ग सुचवेल. पर्यावरणपूरक मूर्ती, कृत्रिम विसर्जन तलाव आणि निर्माल्य संकलन केंद्रांची माहिती मोबाईलवर मिळेल. या सर्व व्यवस्थेमुळे भाविकांचा वेळ वाचू शकतो आणि प्रशासनाला उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामग्री अधिक परिणामकारक पद्धतीने वापरता येऊ शकते.

श्रद्धा कायम, व्यवस्था ‘स्मार्ट’
एआय आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानामुळे गणेशोत्सवाचा आत्मा बदलणार नाही. उलट योग्य वापर झाल्यास उत्सवाचे व्यवस्थापन अधिक सुरक्षित, सुटसुटीत, पारदर्शक आणि पर्यावरणपूरक करण्याची संधी निर्माण होऊ शकते. सर्व नवतंत्रज्ञानाच्या गोष्टी एकत्र आल्यास गणेशोत्सवाच्या व्यवस्थापनाचे नवे मॉडेल उभे राहू शकते.
मात्र तंत्रज्ञानाचा वापर करताना व्यक्तिगत गोपनीयता, डेटा सुरक्षा, सायबर फसवणूक, एआय प्रणालींची अचूकता आणि मानवी देखरेख याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तंत्रज्ञान हे सहाय्यक असावे, अंतिम निर्णय घेणारी एकमेव व्यवस्था नव्हे. शेवटी गणेशोत्सवाची खरी ओळख आहे ती श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोपा आणि ‘गणपती बाप्पा मोरया’, च्या जयघोषात एकत्र येणाऱ्या लाखो लोकांमध्ये. कोणतेही तंत्रज्ञान त्या भावनेची जागा घेऊ शकत नाही आणि तशी त्याची गरजही नाही.
तंत्रज्ञान श्रद्धेची जागा घेण्यासाठी नाही, तर श्रद्धेचा उत्सव अधिक सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी आहे. परंपरेतील पावित्र्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता यांचा योग्य समतोल साधता आला, तर भविष्यातील गणेशोत्सव अधिक ‘स्मार्ट’ असतानाच अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशकही होऊ शकतो.
बदलत्या काळासोबत उत्सवाचे व्यवस्थापन बदलत राहील, नवी साधने येतील, एआय अधिक सक्षम होईल; पण प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी भाविकांची सुरक्षितता, सुविधा आणि विश्वास ठेवला गेला तरच हा बदल खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल.
आणि म्हणूनच भविष्यात गणरायाच्या स्वागताचा जयघोष पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादातच होईल; फरक एवढाच असेल की त्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पडद्यामागे एआय, डेटा आणि डिजिटल तंत्रज्ञानही सज्ज असेल. श्रद्धा पारंपरिक असेल, उत्साह तोच असेल; पण व्यवस्थापन अधिक ‘स्मार्ट’ असेल - हाच भविष्यातील गणेशोत्सवाचा नवा चेहरा ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com