मतमतांतरे, गुरुवारसाठी

मतमतांतरे, गुरुवारसाठी
Published on

सर्वच पातळ्यांवर गैरव्यवस्था
गडचिरोलीतील आदिवासी आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची बातमी वाचली. एकूणच महाराष्ट्रातील इतर आश्रम शाळांची अवस्था तपासण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्याने त्या शाळेची तपासणी केली व अहवाल तयार केला त्याचे निलंबन करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सर्वच पातळ्यांवर गैरव्यवस्था असल्यामुळे अशा घटना घडत आहेत. कायदे आहेत, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठविणे गरजेचे आहे.
- शांताराम वाघ, पुणे

प्रामाणिक राजकीय नेतृत्व हवे
‘आदिवासी विकास कागदावरच’ यातून विदारक चित्र दिसले. आदिवासींसाठी जो सरकारी निधी असतो, त्याचा वापर प्रामाणिकपणे होणे आवश्यक आहे. ‘क्रिमीलेअर’ने आदिवासींचे प्रश्न सुटणार नाहीत. तेव्हा जेवढी बंधने जास्त तेवढा भ्रष्टाचार जास्त. आदिवासींचा विकास होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन इतरांनी आपली संपत्ती वाढवू नये. आदिवासींचा विकास कागदावरच राहू नये. यासाठी प्रामाणिक राजकीय नेतृत्व असणे गरजेचे आहे. सध्या काही आदिवासीतील नेतृत्व त्या-त्या राजकीय पक्षांची लाचारी करत असल्याचे दिसते. त्यामुळे आदिवासींचा विकास कागदावरच राहतो.
- युगानंद साळवे, पुणे

आश्रमशाळांची जबाबदारी कुणाची?
भारताला २०४७मध्ये विकसित, महासत्ताच्या रूपात पाहत आहोत. त्याच देशातील प्रगत महाराष्ट्रमध्ये गडचिरोलीतील आदिवासी आश्रम शाळेतील तीन मुलांना सरकारी हलगर्जीपणामुळे सर्पदंशामुळे जीव गमवावा लागला. आश्रमशाळांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर मुले सुरक्षीत नसतील तर याची जबाबदारी कोणाची? घटना घडल्यानंतर चौकशीत कोण जबाबदार ते कळेलच, पण घटना होऊच नये यासाठी आधीच जबाबदारी निश्‍चित का केली जात नाही? विकसित भारत हे फक्त एक स्वप्न राहू नये एवढीच अपेक्षा.
- सिद्धार्थ बागुल, पुणे

‘इस्लामिक नाटो’ अन् भारत
पाकिस्तान, तुर्कस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील वाढते सामरिक व संरक्षण सहकार्य पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. या सहकार्याला काही ठिकाणी ‘इस्लामिक नाटो’ असे संबोधले जात असले, तरी त्याकडे भावनिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता राष्ट्रीय हिताच्या चौकटीतून पाहणे आवश्यक आहे. भारतासाठी ही घडामोड निश्चितच महत्त्वाची आहे. पाकिस्तानला व्यापक संरक्षण व तांत्रिक सहकार्य मिळाल्यास त्याचा दक्षिण आशियातील सामरिक संतुलनावर परिणाम होऊ शकतो. मात्र भारताने घाबरून प्रतिक्रिया न देता आपली संरक्षण क्षमता, अर्थव्यवस्था आणि कूटनीती अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. मजबूत अर्थव्यवस्था, सक्षम संरक्षण व्यवस्था आणि दूरदृष्टीचे परराष्ट्र धोरण यांच्या बळावर भारत कोणत्याही नव्या आघाडीचा सामना करू शकतो.
- श्याम ठाणेदार, दौंड (जि. पुणे)

रेल्वेसाठी डिझेल इंजिन वापरावे
पुणे ते नाशिक नियोजित वेगवान रेल्वेचा प्रस्ताव नारायणगावजवळच्या राष्ट्रीय अवकाश संशोधनाच्या दुर्बिणीमुळे खोळंबला असल्याचे वृत्त वाचले. रेल्वेच्या इंजिनाचे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांबरोबर घर्षण होऊन निर्माण झालेल्या लहरींचा दुर्बिणींच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मत मांडले गेले. या समस्येवर एक मत मांडावेसे वाटते. पुणे ते मंचर इलेक्ट्रिक इंजिन वापरावे. मंचर ते आळेफाटा डिझेल इंजिन वापरावे व नंतर आळेफाटा ते संगमनेर, सिन्नर मार्गे नाशिक पुन्हा इलेक्ट्रिक माध्यमाचा वापर करावा. पुणे ते नाशिक रेल्वेचा मार्ग मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर असा केला तर सर्व संबंधित गावांचा विकास होईलच. शिवाय भविष्यकाळाचा विचार केल्यास लोकसंख्येचा लोंढादेखील विभागला जाईल असे वाटते.
- डॉ. श्रीकांत नाडगौडा, पुणे

जनावरांचे ‘कलिंग’ आवश्यक
कबुतरांच्या समस्येपेक्षा जटिल समस्या कुत्रे, गाई, बैल, बिबट्या, हत्ती, नीलगाय, डुक्कर, रानडुक्कर, हरिण, गवा, माकड, वानर, घोडे यांची आहे. कुत्र्याच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिक हैराण आहेत. गायींमुळे असंख्य अपघात होतात. बेवारस जनावरांमुळे वाहतुकीमध्ये बाधा निर्माण होते, रोग पसरतात. ही समस्या कशी सोडवणार? त्यासाठी जनावरांचे ‘कलिंग’ आवश्यक आहे (कलिंग म्हणजे प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी किंवा उपद्रवी, आजारी प्राण्यांना वेगळे करणे किंवा कमी करणे.)
- अनिल गुप्ते, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com