

आजच्या तारखेत गणपती विसर्जन मार्ग नकाशा पीडीएफ स्वरुपात आहे. तो नकाशा वापरायचा आहे.
विसर्जनासाठी एका रांगेची चर्चा
दोन्ही बाजूने येणाऱ्या मंडळांमुळे राजपथावर होते कोंडीची स्थिती; समन्वय अपेक्षित
सिद्धार्थ लाटकर ः सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. ११ : अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद भाविकांना लुटता यावा, यासाठी शहरातील मंडळांनी पुढाकार घेणे आवश्यक बनले आहे. मुख्य मिरवणूक मार्गावर दोन्ही बाजूने येणाऱ्या मंडळांमुळे राजपथावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राजपथावरून एका रांगेत विसर्जन मिरवणूक काढल्यास मंडळांनी केलेल्या सजावटी, मर्दानी खेळ, पारंपरिक नृत्य आदी संस्कृतीचे दर्शन घडणारे प्रसंग भाविकांना पाहता येतील आणि त्यातून उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
शहरात पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच गणेशोत्सव मंडळे होती. त्याकाळी गांधी मैदान मैदान येथून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होत असे. सातारा पालिकेचा गणपती, श्री शिवाजी उदय मंडळाचा गणपती, मानाचे गणपती अशी मिरवणूक निघायची. या मिरवणुकीचा मार्ग गांधी मैदान, तांदूळ आळी, मोती चौक, जांभळी चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, शनिवार चौक, सदाशिव पेठ, मोती चौक, राजवाडा मोती तळे, मंगळवार तळे असा होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर या दोन्ही तळ्यांमध्ये गणेश विसर्जनास प्रतिबंध केला गेला आहे. आता मोती चौकात प्रतापगंज पेठमार्गे बुधवार पेठ येथील कृत्रिम विसर्जन तळ्यात गणरायाचे विसर्जन केले जाते.
दरम्यान, एकच तळे असल्याने विसर्जनास वेळ लागू नये, यासाठी बहुतांश मंडळांकडून विसर्जन मिरवणूक मार्ग सोडून उलट दिशेने गणपती आणला जातो. यामुळे मिरवणूक मार्गावर कोंडी होत असते. भाविकांना मिरवणुकीचा आनंद लुटता येत नाही. गर्दीत लहान मुलांना खेळ दिसत नाहीत. त्यातच ध्वनिवर्धकांमुळे काही मंडळे तासनतास राजपथावरच थांबून राहतात. त्याचा परिणाम सजावटी केलेल्या मंडळांवर होतो. हे चित्र बदलण्यासाठी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यास एकेक मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
...............................
कोट
ज्या पद्धतीने सर्व गणेशोत्सव मंडळांनी आगमन सोहळा शिस्तबद्ध काढला, त्याच पद्धतीने विसर्जन मिरवणूकही निघेल. उत्सव साजरा करीत असताना त्यास शिस्तही असावी, यासाठी समिती आग्रही आहे. जे काही निर्णय होत आहेत, तसेच यापुढे होतील हे सर्व मान्य असावेत, असा समितीचा आग्रह राहणार.
- अभिजित बारटक्के,
उपाध्यक्ष, सातारा गणेशोत्सव सार्वजनिक समन्वयक समिती, सातारा.
--------------------
बहुतांश मंडळांच्या गणपतीच्या ट्रॉली मोठ्या आहेत. गुरुवार पेठेतील रस्ता अरुंद आहे. काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत. यामुळे वरच्या भागातील मंडळे थेट कमानी हौदाकडे जाण्यासाठी तयार होत नाहीत. मिरवणुकीचा आनंद भाविकांना लुटता यावा, यासाठी यंदा आम्ही मुख्य विसर्जन मिरवणुकीतील रांगेत जाणार आहोत. त्यासाठी आम्ही सायंकाळी पाच वाजता कमानी हौदाकडून देवी चौक, जांभळी चौकमार्गे जाणार आहे. मोती चौकातून वळसा मारून रांगेतून पुन्हा कमानी हौदाकडे मिरवणूक जाईल.
- अशोक मोने,
अध्यक्ष, बाल दत्त गणेशोत्सव मंडळ, गुरुवार पेठ, सातारा.
---------------------
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी साताऱ्यासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. आता तर सातारा शहरासह खेडेगावातूनही ढोल-ताशा पथके तयार होत आहेत. मुख्य मिरवणूक मार्गावरून जाताना ढोल-ताशांचा गजर भाविक तल्लीन होऊन ऐकत असतात. विसर्जन मिरवणुकीचा आबालवृद्ध आनंद लुटत असतात. त्यासाठी मिरवणुकीचा मार्ग सुसह्य असणे गरजेचे आहे.
- शंभू तांबोळी,
सम्राट मंडळ, सदाशिव पेठ, सातारा.
------------------------------------------------------
विसर्जन मिरवणूक तासनतास का रखडते? हे त्या त्या मंडळांचे कार्यकर्ते जाणतात. भक्ती आणि शिस्तीचा मेळ हरवल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो. साताऱ्याच्या मिरवणूक मार्गाचे गॅझेट आहे, ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.
- श्रीकांत शेटे,
कुटुंबप्रमुख, प्रकाश मंडळ, शेटे चौक, सातारा.
---------------------------------------------
मुख्य विसर्जन मिरवणूक एकेरी असावी, यासाठी मंडळांच्या सातत्याने बैठका घेतल्या. राजवाड्याकडून राजपथ मार्गावर एकाच रांगेत मंडळांच्या मिरवणुका निघतील. जांभळी चौक, देवी चौक, गुरुवार पेठ या वरच्या भागातील गणेशोत्सव मंडळांनी सायंकाळी सात वाजण्यापूर्वी मिरवणुका काढण्याच्या सूचना केल्या आहेत.
- विपुल पाटील,
पोलिस उपअधीक्षक, सातारा.
---------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.