

बोरगाव पोलिसांतर्फे
‘गणराया ॲवॉर्ड’ स्पर्धा
काशीळ, ता. १८ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक एकोपा, पर्यावरण रक्षण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने ‘गणराया ॲवॉर्ड २०२६’ पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या उपक्रमांतर्गत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणाऱ्या गावांचा विशेष गौरव केला जाणार आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगावचे प्रभारी अधिकारी प्रशांत हुले यांनी या स्पर्धेचे नियोजन केले आहे.
स्पर्धेसाठी धर्मादाय आयुक्त, पोलिस ठाणे आणि ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी असणे अनिवार्य आहे. मूल्यांकनामध्ये मूर्तीची उंची तीन ते पाच फूट असणे, पारंपरिक वाद्ये, शिस्त, स्वच्छता, मंडळात सीसीटीव्हीची सोय आणि गुलालमुक्त विसर्जन मिरवणूक या बाबी तपासल्या जाणार आहेत.
याशिवाय रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महिला सबलीकरण, गाव स्वच्छता मोहीम, सौरऊर्जेचा वापर तसेच ऐतिहासिक, पौराणिक व वैज्ञानिक देखावे सादर करणाऱ्या मंडळांना प्राधान्य दिले जाईल. विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर केल्यास संबंधित मंडळाचे १५ गुण थेट वजा केले जाणार आहेत.
स्पर्धेच्या परीक्षणासाठी पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ पाटील, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धनाजी कणसे, महेंद्र निकम, मंगेश काशीद, तुषार साळुंखे, दीपक मांडवे व केतन जाधव यांची समिती मंडळांची पाहणी करणार आहे. गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी अधिकारी प्रशांत हुले यांनी केले आहे.
-------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.