

आळंदी, ता. १ : आळंदीत यंदाचा गणेशोत्सव ध्वनी प्रदूषणमुक्त साजरा करावा. उत्सवात डॉल्बी, डीजेसह मिरवणुकीत लेझर आणि प्लाझ्माच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना सर्व आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी चाकण विभागाचे सहायक पोलिस आयुक्त योगेश रांजणकर, आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी आळंदी नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उत्सव काळात मद्यपान करून फिरण्यास किंवा मंडपाच्या आवारात कोणत्याही प्रकारचा जुगार खेळण्यास सक्त मनाई आहे. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि गर्भवती महिलांच्या परिसरात आवाजाची पातळी कमी ठेवावी, तर रुग्णालय व शाळांच्या परिसरात ध्वनीक्षेपक पूर्णपणे बंद ठेवावेत, अशा सूचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिल्या. हे नियम औद्योगिक कंपन्यांनाही लागू राहतील. चाकण चौक, वडगाव रस्ता व मरकळ रस्त्यावरून येणाऱ्या विसर्जन मिरवणुका चावडी चौकातून पोलिसांच्या सूचनेनुसार मार्गस्थ होतील, असेही त्यांनी नमूद केले.
शांतता आणि स्वयंशिस्तीने उत्सव साजरा करा सार्वजनिक उत्सव साजरा करताना मंडळांनी अनधिकृत वीज कनेक्शन टाळावे. मंडपामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये, याची दक्षता घ्यावी. नगरपरिषदेतर्फे रस्त्यांवरील खड्डे बुजवून पथदिव्यांची सोय केली जाईल. सर्वांनी शांततेत आणि स्वयंशिस्तीने कोणतेही गालबोट न लावता उत्सव साजरा करावा.
- प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्ष, आळंदी नगरपरिषद
इंद्रायणीचे पावित्र्य राखा
इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनास नदीत बंदी घालण्यात आली आहे. नगर परिषदेतर्फे इंद्रायणी काठी नगर परिषद चौक आणि वडगाव रस्त्यावरील पार्किंगच्या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले जाणार असून, भाविकांनी मूर्तींचे विसर्जन तेथेच करावे. निर्माल्य नदीत किंवा रस्त्यावर न टाकता नगरपरिषदेच्या निर्माल्य कुंडातच जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मार्गदर्शक नियमावली
सार्वजनिक गणेशमूर्तीचा मंडप टाकताना पोलिस परवानगी आवश्यक.
गणेश दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा कराव्यात.
मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
रात्रीच्या वेळी गणेशमूर्तीच्या रक्षणासाठी मंडळाचे कार्यकर्ते पहारा देण्यासाठी स्वतंत्रपणे नेमावेत.
महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी महिला कार्यकर्त्यांची गणेश मंडळाजवळ नेमणूक करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.