गणेशोत्‍सवासाठी डिप क्‍लिन ड्राईव्‍ह

गणेशोत्‍सवासाठी डिप क्‍लिन ड्राईव्‍ह
Published on

बाप्पाच्या आगमनापूर्वी पालिका अलर्ट

धूरफवारणी, जंतुनाशक फवारणी आणि कचरा निर्मूलनाच्या कामाला वेग

सातारा, ता. २ : शहरातील विविध भागात गणेशोत्‍सवासाठीची धांदल सुरू झाली आहे. या काळात सार्वजनिक आरोग्‍यविषयक कोणत्‍याही समस्‍या उद्‍भवू नयेत, यासाठी पालिकेच्‍या आरोग्‍य विभागाने डीप क्लीन ड्राइव्‍ह मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध प्रभागांतील सार्वजनिक ठिकाणांसह अंतर्गत भागांची पूर्ण सफाई करण्‍यात येत आहे.
सातारा शहराची प्रशासकीय कामकाजासाठी पालिकेच्‍या मार्फतीने २५ प्रभागांत विभागणी केली आहे. यात शाहूपुरी, विलासपूर या दोन पूर्ण ग्रामपंचायती व शाहूनगरसह इतर उपनगरांचा समावेश आहे. विस्‍तारीत भाग पालिकेत आल्‍याने पालिकेच्‍या आरोग्‍य विभागावर या मूळ शहरासह विस्‍तारीत भागातील सार्वजनिक आरोग्‍य अबाधित ठेवण्‍याची जबाबदारी आली आहे. यामुळे संपूर्ण भागाचा आराखडा करत पालिकेचा आरोग्‍य विभाग संपूर्ण सफाईसह कचरा संकलनासाठी कार्यरत आहे.
गणेशोत्‍सव अवघ्‍या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, त्‍यासाठीच्‍या तयारीला सर्वत्र वेग आला आहे. गणेश मंडळांचे पदाधिकारी मंडप उभारणीसह देखावे, सजावटीच्‍या कामात गुंतले आहेत. या काळात सार्वजनिक ठिकाणचे आरोग्‍य धोक्‍यात येऊ नये, यासाठी दक्षता आरोग्‍य विभाग घेत आहे. सार्वजनिक ठिकाणी जमलेला कचरा हटवण्‍यासह गवत व इतर झाडाझुडपांची कापणी करण्‍यात येत आहे. यामुळे कीटकजन्‍य साथरोग पसरण्‍याचे प्रमाण कमी झाले आहे.
शहरात २२५ हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. यापैकी अनेक मंडळांच्‍या मूर्ती मोठ्या असतात, तर अनेक मंडळांचे देखावे आकर्षक असतात. या मूर्ती व देखावे पाहण्‍यासाठी या मंडळांच्‍या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असते. अशा मंडळांसह इतर सर्वच छोट्यामोठ्या मंडळांच्‍या परिसरातील सफाईवर आरोग्‍य विभागाने जास्‍तीचे लक्ष केंद्रित केले आहे. धूरफवारणीसह जंतुनाशकांची फवारणी या मंडळांसह शहराच्‍या इतर सर्वच भागात आरोग्‍य विभागाच्‍या मार्फतीने हाती घेण्‍यात आली आहे.
...............
स्वच्छतेचे आवाहन
सणासुदीच्‍या काळात सार्वजनिक आरोग्‍य धोक्‍यात येऊ नये, यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचराफेक न करण्‍याचे आवाहन तसेच कचरा घंटागाडीतच टाकण्‍याचे आवाहन पालिकेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.
................
सफाईसाठी कर्मचारी तैनात
शहरांतर्गत सफाईसाठी सद्यःस्‍थिती पालिकेचे २० कर्मचारी, तर त्रयस्‍थ यंत्रणेचे १५० कर्मचारी तैनात आहेत. दैनंदिन कचरा संकलनासह सार्वजनिक ठिकाणांची सफाई करण्‍यावर या कर्मचाऱ्यांकडून भर देण्‍यात येत असून, साथरोग निवारणासाठीच्‍या जास्‍तीच्‍या उपाययोजना त्‍यांच्‍याकडून राबवल्‍या जात आहेत.
...........
कचरा सफाईसाठीच्‍या कर्मचाऱ्यांचा एआय फोटो वापरणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com