पुणेकरांमध्ये खरेदीचा उत्साह

पुणेकरांमध्ये खरेदीचा उत्साह
Published on

पुणे, ता. ३० : गणरायाचे आगमन येत्या सोमवारी (ता. १४) होणार असल्याने बाजारपेठांमध्ये रविवारी खरेदीचा मोठा उत्साह दिसून आला. सजावटीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, बोहरी आळी, कुमठेकर रस्ता आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

गणपतीसाठी तोरणे, फुलांच्या माळा, पडदे, कापड, कृत्रिम फुले, झेंडूच्या माळा, एलईडी माळा, रंगीबेरंगी दिवे, सजावटीच्या छत्र्या, मखराचे साहित्य तसेच कागदी, पुठ्ठ्याचे आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंना मागणी होती. काही नागरिक पारंपरिक सजावटीला पसंती देत होते, तर काही जण आकर्षक थीमसाठी हटके साहित्य शोधताना दिसत होते. घरगुती गणपतीसाठी लहान मखर, रेडिमेड डेकोरेशन किट, कृत्रिम फुलांच्या माळा आणि एलईडी लाइटिंगला विशेष पसंती मिळाली. तर सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते मंडपासाठी लागणारे कापड, पडदे, विद्युत रोषणाई आणि सजावटीचे साहित्य खरेदी करताना दिसले. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढल्याने रविवार पेठ, बोहरी आळी आणि लक्ष्मी रस्ता परिसरात काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली. मात्र, गैरसोय बाजूला ठेवत नागरिकांमध्ये गणरायाच्या स्वागताचा उत्साह ओसंडून वाहत होता.

कमी किमतीत विविध पर्याय
बाजारात यंदा सजावटीच्या साहित्याची मोठी विविधता उपलब्ध झाली आहे. काही ठिकाणी छोट्या सजावटीच्या वस्तू २० ते ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत, तर मोठे मखर, आकर्षक तोरण, फुलांच्या माळा आणि विशेष डेकोरेशनचे साहित्यही उपलब्ध आहे. यंदा विविध प्रकारच्या एलईडी माळा, पडद्यावरील लाइटिंग, डिस्को लाईट्स, विविध रंगांच्या फोकस लाईट्स, कृत्रिम फुलांच्या लाइटिंगला मागणी असल्याचे शामकुमार तिवारी यांनी सांगितले.

रविवार पेठेत फोमच्या पाट्या आणि शीट्स खरेदी करण्यासाठी मेट्रोमुळे शहराच्या लांबच्या भागांतूनही नागरिक येत आहेत. एकाच ठिकाणी मुबलक पर्याय आणि विविध आकारांतील साहित्य उपलब्ध होत असल्याने ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे जात आहे.
- मनोज नवांदार, फोम साहित्य विक्रेते

घरसजावटीसाठी आवश्यक साहित्य घेतले. यंदा पारंपरिक फुलांच्या माळांसोबत लाइटिंग, तयार सजावटीच्या वस्तू तर गणपती डेकोरेशनसाठी कार्डबोर्डचे विविध नक्षीकाम असलेले पर्याय विकत घेतले आहेत.
- तेजस्विनी पाटील, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com