

पुणे, ता. १७ : ‘सोनपावलांनी गौराई आली’, असे म्हणत पारंपरिक उत्साहात गणरायापाठोपाठ माहेरवाशीण गौरींचे गुरुवारी घरोघरी आगमन झाले. अनुराधा नक्षत्र दिवसभर असल्याने महिलांना आपल्या सोयीनुसार गौरींचे आवाहन आणि सजावट करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला. अनेक घरांमध्ये दुपारनंतर तिन्हीसांजेपूर्वी गौरी आवाहन करण्यात आले.
महालक्ष्मी असे संबोधिल्या जाणाऱ्या गौरींच्या आगमनाचा महिलांमध्ये उत्साह होता. अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते. गुरुवारी सकाळपासून सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्राचा कालावधी असल्याने घरोघरी सर्व तयारी पूर्ण झाल्यावर ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे आवाहन करण्यात आले. अनेक घरांमध्ये गौरींसाठी दरवर्षी नव्या साड्यांची खरेदी करून त्या गौरींना नेसवल्या जातात. कुलाचारानुसार घरोघरी गौरीच्या पितळी तसेच शाडूच्या मुखवट्यांची पूजा करण्यात आली. काही घरांमध्ये खड्यांच्या गौरींची प्रथा असते.
आकर्षक रांगोळ्या काढून आणि हळदी-कुंकवाचे जल शिंपडून गौरी आवाहन करण्यात आले. जरीकाठाच्या नव्या साड्या नेसवून अलंकार परिधान केल्यानंतर गौरींचे रूप खुलले. फुलांची आरास करून गौरींना सजविण्यात आले. गौरी आगमनानंतर फराळाचे पदार्थ मांडून विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती. धन, धान्य, ऐश्वर्य आणि आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करून गौरींचे आवाहन झाल्यानंतर आरती करण्यात आली.
गौरी आगमनानंतर महिलांची शुक्रवारी (ता. १८) होणाऱ्या गौरी पूजनाच्या तयारीची लगबग सुरू झाली. हळदी-कुंकू समारंभातील खिरापत तयार करण्यापासून ते गौरी पूजनाच्या नैवेद्याच्या तयारीत महिला व्यग्र झाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.