

पिंपरी, ता. १९ ः गणेशोत्सवातील वीकेंड सुरू होताच शहरात गणरायाचे आकर्षक देखावे आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी शहरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना झाली. शनिवारी घरगुती गौरी-गणपती विसर्जन केल्यानंतर नोकरदार वर्ग, तरुण आणि कुटुंबे सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले.
विशेष म्हणजे पिंपरी ते पुणे प्रवास करण्यासाठी आणि स्थानिक मंडळांना भेटी देण्यासाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बसना मध्यरात्रीपर्यंत ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी होत आहे. शहर परिसरातील पिंपरीगाव, चिंचवडगाव, मोहननगर, आकुर्डी, निगडी, रुपीनगर, सांगवी, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, भोसरी, मोशी आदी परिसरातील रौप्यमहोत्सवी आणि सुवर्णमहोत्सवी वर्षे साजरी करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी पौराणिक आणि विविध संकल्पनांवर आधारित सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे देखावे सादर केले आहेत. अनेक मंडळांनी जिवंत आणि हलते देखावे सादर केले आहेत. त्यामुळे रात्री १० नंतर देखावे पाहण्यासाठी भाविक घराबाहेर पडत आहेत. मंडपाबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
शनिवार-रविवारची सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी अनेक जण सहकुटुंब बाहेर पडल्याने मध्यवर्ती भागांत पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. विशेष म्हणजे चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरातही भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
मध्यरात्रीही ''रेकॉर्ड ब्रेक'' गर्दी
गणरायाचे देखावे पाहण्यासाठी शहरांत मध्यरात्री ३-४ वाजेपर्यंत सार्वजनिक वाहतुकीत ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी होत आहे. रात्रीच्या वेळी रस्ते वाहनांसाठी बंद केल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत आहेत. सध्याची गर्दी लक्षात घेता आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलने मुख्य विसर्जन मिरवणुकीपर्यंत आणि वीकेंडला मध्यवर्ती भागातून शहराच्या विविध उपनगरांमध्ये सोडण्यासाठी रात्रभर विशेष बसेस सुरू ठेवल्या आहेत. गर्दीचा अंदाज घेऊन पुणे मेट्रोने आपली सेवा रात्री २ वाजेपर्यंत वाढवली आहे. शनिवार आणि रविवारच्या वीकेंडला प्रवाशांचा आकडा रोज ३ ते ४ लाखांच्या वर गेला आहे.
जड वाहनांना बंदी
उत्सव काळात (१२ ते २६ सप्टेंबर) शहरातील १२ मुख्य रस्त्यांवर जड आणि अवजड वाहनांना २४ तास नो-एन्ट्री लागू करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी विविध परिसरातील रस्त्यांवर पार्किंगला पूर्ण मनाई करण्यात आली असून पार्किंग व्यवस्था केली आहे.
---
पुण्याकडे जाणाऱ्यांची गर्दी
पिंपरी-चिंचवडमधील लाखो नागरिक मानाचे गणपती आणि दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी मेट्रोने पुणे शहरात जात असल्याने रात्री १२ नंतरही ‘पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट’ मेट्रो हाऊसफुल्ल धावत आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.