

पुणे, ता. ११ : गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. या काळात गणेश मंडळांकडून भाविकांना अन्नदान, प्रसादवाटप करण्यात येते. मात्र, या मंडळांना त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) यंदा नोंदणी करावी लागणार आहे. दरम्यान, या प्रक्रियेविषयी मंडळे देखील संभ्रमावस्थेत आहेत.
गणेशोत्सव काळात गणेश मंडळांचा प्रसाद व अन्नवाटप पूर्णपणे स्वच्छ आणि सुरक्षित असावे, यासाठी काही दिवसांपूर्वी ‘एफडीए’ने नवी नियमावली जारी केली. त्याबाबत ‘एफडीए’ने याविषयी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यामध्ये मंडळांसाठी नोंदणीप्रक्रिया अपरिहार्य आहे. मात्र, ही नोंदणी कोणी, कशी करायची याचे निकष काय, याविषयी मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
या दहा दिवसांच्या उत्सवात बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके गणेश मंडळांच्या महाप्रसाद व अन्नवाटपाच्या दर्जाची प्रत्यक्ष पाहणी करतील. त्याचप्रमाणे अन्न तयार करताना होणारी अस्वच्छता किंवा घाण यावरही या पथकांची नजर असणार आहे. जी गणपती मंडळे अन्नदान करणार आहेत, त्यांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी १२ महिन्यांसाठी, तीन महिन्यांसाठी अथवा गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीसाठीही घेता येईल. तीन महिने आणि दहा दिवसांसाठी नोंदणीशुल्क शंभर रुपये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती ‘एफडीए’चे सह आयुक्त दिगांबर भोगावडे यांनी दिली.
.............................
मंडळांना नोंदणीसाठी ‘वेब लिंक’
अन्नवाटप आणि प्रसादवाटप करणारी मंडळे या नव्या नियमांवरून संभ्रमावस्थेत आहेत. प्रशासनाने नोंदणीसाठी https://foscos.fssai.gov.in/apply-for-lic-and-reg ही लिंक दिली असून, यावर मंडळांनी आपली सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.