

राजकारणासाठी राज्यातील प्रवासी वेठीला
मुंबईतून ५ हजार ७०० बसेस कोकणात; निम्म्या बसेसवर उर्वरित महाराष्ट्राचा भार
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई ः कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी तसेच मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या स्थानिक राजकारणात मतदारांना खूश ठेवण्यासाठी संपूर्ण राज्यातील एसटी प्रवाशांना वेठीला धरण्याचे काम सध्या सुरू आहे. एसटी महामंडळ १२ कोटी रुपयांहून अधिक तोट्यात असून, महामंडळाच्या बोटचेप्या धोरणामुळे त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील ५ हजार ७०० एसटी बसेस मुंबईत दाखल झाल्या असून, त्यापैकी २ हजार ९०० बसेस एकट्या ठाण्यातून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित बसेस मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक आणि काही मंडळांनी ग्रुप बुकिंग करून कोकणात सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात उर्वरित महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात जातात. गेल्या काही वर्षांपासून त्यासाठी जादा एसटी बसेस सोडल्या जात होत्या. मात्र, आता मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत स्थानिक राजकारणासाठी मुंबईतील लोकप्रतिनिधी एसटी महामंडळाचा वापर करत आहेत. महामंडळाकडे सध्या १४ हजार नवीन बसेस उपलब्ध आहेत. त्यापैकी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आगारांतून बसेस मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ निम्म्या बसेस उर्वरित महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहेत.
गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा केल्याने शाळांना पाच दिवसांची सुटी आहे. तसेच नियमित बसेसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या प्रवाशांना खासगी बसेसमधून प्रवास करावा लागणार आहे. सध्या खासगी वाहतूकदारांनी चारपट दरवाढ केली असून, त्याची गंधवार्ताही परिवहन विभागाला नाही. याबाबत मंत्री कार्यालयाला विचारणा केली असता, परिवहन आयुक्तांना सूचना केल्या जातील, असे सांगण्यात आले आहे. मात्र, या सूचना करण्याआधीच अनेक बसेसचे बुकिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना सणासुदीत पदरमोड करूनच प्रवास करावा लागणार आहे.
एसटीची कोकणातील सेवा ग्रुप बुकिंगची असल्याने २७ टक्के अधिभार लावण्यात आला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोही रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या खर्चात वाढ होणार आहे. दर वर्षी ऐन हंगामात नफा होण्याची शक्यता असते, तेव्हा राजकीय हस्तक्षेपाने एसटीला तोटा होतो. त्यामुळे यावेळी ग्रुप बुकिंग द्यायचे नाही, दिले तर २७ ते ३० टक्के अधिभार लावायचा, असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला होता. मात्र, त्यांच्या पक्षनेतृत्वामुळे हा निर्णय मागे घ्यावा लागला.
राज्यभरातून ५ हजार ७०० बसेस मुंबईत येत असताना त्यात प्रवासी नसतात. शिवाय कोकणातून परतीचा प्रवास करतानाही या बसेस रिकाम्या येत असतात. त्यामुळे डिझेलचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत आहे. ही मालिका गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.
कोकणवासीयांची होलपट
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, परतीच्या प्रवासाची कोणतीही सोय केली जात नाही. पाच दिवस बसेस थांबून राहू शकत नाहीत. त्यामुळे रेल्वे आणि अन्य वाहनांमधून धक्के खात प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मोफत नव्हे, तर जादा बसेस सोडाव्यात, अशी कोकणवासीयांची मागणी आहे. त्यामुळे प्रवासी तिकीट काढून सोईने प्रवास करू शकतील, असे त्यांचे म्हणणे आहे.
खासगी बसचालकांकडून लूट
महामंडळाच्या बसेसचा तुटवडा असल्याने आणि रेल्वे आरक्षण फुल्ल असल्याने राज्यभरातील खासगी बसचालकांनी तीन ते चार पट भाडेवाढ केली आहे. या लुटीकडे परिवहन विभागाने दुर्लक्ष केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.