चाकणमध्ये गुलालाची उधळण

चाकणमध्ये गुलालाची उधळण
Published on

चाकण, ता. १४ : ''गणपती बाप्पा मोरया''च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात चाकण शहर व परिसरात सार्वजनिक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात झाली. सकाळपासून निघालेल्या मिरवणुकांमध्ये तरुणाईने नृत्य करत जल्लोष केला. गुलालाची उधळण, आकर्षक फुलांची सजावट आणि पारंपरिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.
सकाळपासूनच विविध मंडळांच्या गणेशमूर्तींची विधिवत पूजा, मंत्रोच्चार आणि आरती करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. काही मंडळांनी सामाजिक संदेश देणारे, तर काहींनी पौराणिक कथांवर आधारित जिवंत व हलते देखावे साकारले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंडळांच्या स्वयंसेवकांसह शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उत्सवामुळे चाकणच्या बाजारपेठेतही चैतन्य पसरले होते. फुले, हार, पूजेचे साहित्य आणि खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यंदाही पेण, अहिल्यानगरसह स्थानिक कारखान्यांतील मूर्तींना मोठी मागणी होती. प्रशासनाने शांतता व स्वच्छतेचे आवाहन केले असून, पुढील दहा दिवसांत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घरगुती गणेशोत्सवाचा उत्साह चाकण परिसरात सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये बाप्पांचे आगमन झाले. अनेकांनी मुहूर्तावर विधिवत प्रतिष्ठापना केली. घरगुती मूर्तीही वाजत-गाजत नेण्यात आल्या. दरम्यान, कडाचीवाडी येथील पुरातन गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

औद्योगिक वसाहतीतही जल्लोष
औद्योगिक वसाहतीतही जल्लोष चाकण औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्येही गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. कामगारांनी सकाळी वाजत गाजत गणरायाच्या मूर्ती आणल्या. येथेही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो, अशी माहिती कामगार नेते जीवन येळवंडे यांनी दिली.

यंदा मूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर आणि वाहतूक खर्च वाढल्याने गणेश मूर्तींच्या भावात साधारणतः तीस ते पस्तीस टक्के वाढ झाली आहे.
- नवनाथ कानगुडे, गणेश मूर्ती विक्रेते

ID: PNE26W49607

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com