कानठळ्या बसविणारा आव्वाज पिंपरीत

गणेशोत्सव
गणेशोत्सव

पिंपरी : गणेशोत्सव काळात शहरातील ध्वनिप्रदूषण सहनशीलतेच्या पलीकडे जात असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत आढळले आहे. यात महत्त्वाच्या पिंपरीतील झुलेलाल घाट, कराची चौक, चिंचवडचा चापेकर चौक, मोरया गोसावी घाट, भोसरीतील पीएमटी चौक, जुनी सांगवी आणि मोशीतील मिरवणूक मार्गांचा समावेश आहे. गेल्या वर्षी चार मिनिटेही आवाज सहन करू शकणार नाही, अशी 107 डेसिबलपेक्षा अधिक ध्वनिपातळीची नोंद या ठिकाणांवर झाली आहे. 

जुनी सांगवीतील बहुतांश मंडळे गणेशोत्सवाच्या सातव्या व भोसरीतील मंडळे नवव्या दिवशी विसर्जन मिरवणुका काढतात. नेहरूनगर, संत तुकारामनगर, खराळवाडी, मोरवाडी, पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, काळेवाडीतील मंडळे पिंपरीतील झुलेलाल घाटावर आणि काळभोरनगर, मोहननगर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, चिंचवडगावातील मंडळे चिंचवड येथील मोरया घाटावर विसर्जन करतात. या ठिकाणी गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला डीजे व ढोल-ताशांचा दणदणाट 107 ते 112 डेसिबलपर्यंत नोंदविला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकानुसार 85 डेसिबलपर्यंतचा आवाज आठ तासांपर्यंत तर, शंभर डेसिबलपर्यंतचा आवाज 15 मिनिटांपर्यंत सहन करता येतो. त्यापेक्षा अधिक आवाज ऐकल्यास दीर्घकाळ दुष्परिणाम होतात. पिंपरी व चिंचवड येथील मिरवणुका बारा तासांपेक्षा अधिक वेळ सुरू असतात. त्यामुळे वाद्यांचा आवाज कमी ठेवण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे मत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे. 

ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम 
- चक्कर येणे, उलटी होणे, भूक मंदावणे, निद्रानाश, हृदयविकार 
- माणसाच्या वागणुकीत बदल होणे, चिडचिडेपणा वाढणे 
- तात्पुरते किंवा कायमचा बहिरेपणा येणे, अस्वस्थता वाढणे 
- शारीरिक, मानसिक थकवा येणे, लक्ष विचलित होणे 
- रक्तवाहिन्या आकुंचन पावणे, श्‍वासोच्छ्वासाचा वेग वाढतो 
- मेंदूचा रक्तपुरवठा अचानक वाढणे, रक्तदाब वाढणे 

उपाययोजना 
- आवाजाच्या ठिकाणी इअर प्लग किंवा इअर मास्क वापरणे 
- वाद्यांचा किंवा तत्सम वस्तूंचा आवाज कमी ठेवणे 
- फटाके न वाजविणे किंवा कमी तीव्रतेचे वापरणे 
- ध्वनिक्षेपकांचा आवाज मर्यादित ठेवणे 
- मंडळासह नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत जागृती करणे 

गेल्या वर्षीची ध्वनी नोंद 
ठिकाण डेसिबल 
पिंपरी झुलेलाल घाट 107 
चिंचवड मोरया घाट 110 
निगडी विसर्जन मार्ग 112 
भोसरी पीएमटी चौक 107 
सांगवी विसर्जन मार्ग 108 
मोशी इंद्रायणी घाट 112 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नमूद सहनशील ध्वनिपातळी व कालावधी 
डेसिबल कालावधी 
85 8 तास 
88 4 तास 
91 2 तास 
94 1 तास 
97 30 मिनिटे 
100 15 मिनिटे 
103 7.5 मिनिटे 
106 4 मिनिटे 
109 2 मिनिटे 
112 1 मिनिटे 
115 30 मिनिटे 

पोलिस ठाण्यांकडे ध्वनिमापक यंत्र 
गेल्या तीन वर्षांत ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या 112 मंडळांवर कारवाई केली आहे. या वर्षी सर्व पोलिस ठाण्यांना ध्वनिमापक यंत्रे दिली आहेत. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश संबंधित ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे पोलिस आयुक्तालयातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com