

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव अधिक दिमाखदार, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे उपक्रम जाहीर केले आहेत. आगामी गणेशोत्सवामध्ये ‘एक उत्सव, एक महाआरती’ हा विशेष उपक्रम राबवण्यासोबतच सर्व गणेशोत्सव मंडळांमध्ये सामूहिक राष्ट्रगीत घेण्याचे आदेश सांस्कृतिक कार्य आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.
या उपक्रमांच्या माध्यमातून उत्सवाच्या काळात राष्ट्रभक्ती आणि सामाजिक ऐक्य अधिक बळकट करण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच, गणेशोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना सांस्कृतिक विभागाकडून विशेष अनुदान दिले जाईल, असे आश्वासनही मंत्री आशीष शेलार यांनी दिले. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गणेशोत्सवात येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निवारण करण्यासाठी शासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची संयुक्त यंत्रणा कार्यन्वित केली जाईल. लालबाग, गिरगाव, शिवाजी पार्क, वडाळा, परळ आणि दादर या भागांत भाविकांच्या सोयीसाठी विशेष बस सेवा पुरवली जाईल. तसेच परदेशी पर्यटकांसाठी विशेष ‘गणेशोत्सव टूर’चे आयोजन केले जाणार आहे.
मूर्तिकारांना विशेष पुरस्कार
मूर्तिकारांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासोबतच विजय खातू आणि दीनानाथ वलीवकर यांच्या नावाने विशेष पुरस्कार देण्यात येतील. गणेशोत्सव मंडळांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र दर्शन रांग, बालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्य केंद्र आणि महिलांसाठी स्व-संरक्षण शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील खड्डे, उड्डाणपुलांवरील गळती, एल-शेप सिग्नलमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि समुद्रातील जेली फिशच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.
तातडीने अंमलबजावणी करा
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सुरू असलेल्या परिसरातील मंडळांना उत्सव साजरा करताना अडथळा येऊ नये म्हणून गणेशोत्सव संपेपर्यंत हे प्रकल्प तात्पुरते थांबवण्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. त्याला शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘‘गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असून, सर्व नागरिकांनी एकत्र येऊन तो मोठ्या उत्साहात साजरा करावा,’’ असे आवाहन करत मंत्री आशीष शेलार यांनी समन्वय समितीच्या सर्व मुद्द्यांवर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.