ग्राम लेख भरतगाववाडी...१९

ग्राम लेख भरतगाववाडी...१९
Published on

गणेश घाडगे यांची
सहकारात भरारी

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, कष्टाची तयारी आणि प्रामाणिकपणा असावा लागतो. या गुणांच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे गणेश विलास घाडगे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत, नोकरीच्या चौकटीतून बाहेर पडून व्यावसायिक, कृषी आणि सहकार क्षेत्रात त्यांनी मिळवलेले यश हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
--------

‘सुयश मेडिकल’ची स्थापना

गणेश घाडगे यांना सुरुवातीपासूनच व्यवसायाची प्रचंड आवड आणि जिद्द होती. मात्र, कौटुंबिक आग्रहास्तव त्यांनी नामांकित ‘गौरीशंकर फार्मसी कॉलेज’ येथे तब्बल १८ वर्षे निष्ठेने नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांना व्यावसायिक बनण्याचे स्वप्न कायम होते. गावातील लोकांना किरकोळ औषधांसाठीही शहरात किंवा बाहेरगावी जावे लागत. लोकांची होणारी ही गैरसोय आणि आर्थिक अडवणूक त्यांनी जवळून पाहिली. वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी, तसेच गावातच माफक दरात औषधे उपलब्ध व्हावीत, या सामाजिक जाणिवेने त्यांनी ‘सुयश मेडिकल’ची स्थापना केली. या वैद्यकीय प्रवासात त्यांच्या पत्नी मेघा घाडगे यांनी खंबीर साथ दिली. मेघा यांनी स्वतः फार्मसीचे शिक्षण घेतलेले असल्याने त्यांच्या तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञानाचा सुयश मेडिकलाच्या यशस्वी उभारणीत मोठा वाटा राहिला.

आधुनिक शेतीचा वस्तुपाठ

नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी आपल्या मूळ शेतीकडेही विशेष लक्ष दिले. पारंपरिक आणि तोट्याच्या ठरणाऱ्या शेती पद्धतीला फाटा देत त्यांनी गेली १८ वर्षे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. नवे तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि आधुनिक शेती पद्धतींचा वापर करून त्यांनी जमिनीतून उत्तम दर्जाचे शेतमाल उत्पादन घेण्यास सुरुवात केली. नोकरी आणि शेती या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करून त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला.

दुग्ध व्यवसायात पदार्पण
गावातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक, दुधाला न मिळणारा योग्य भाव आणि अज्ञानाचा फायदा घेणारे व्यापारी हे चित्र पाहून गणेश घाडगे यांचे मन हेलावले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अखेर १८ वर्षांची सुरक्षित नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर ते पूर्णवेळ डेअरी व्यवसायात उतरले. शेतकऱ्यांना केवळ दुधाचा मोबदला देऊन ते थांबले नाहीत, तर त्यांनी ‘श्री गजानन सहकारी दूध उत्पादक संस्थे’ची स्थापना केली. सध्या ते या संस्थेच्या चेअरमनपदाची धुरा अत्यंत कुशलतेने सांभाळत आहेत.

पारदर्शक कारभार

श्री गजानन दूध संस्थेच्या माध्यमातून त्यांनी डेअरी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. पारदर्शक फॅट मोजणी व कॅमेरा सिस्टिम दूध संकलन केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी आधुनिक फॅट मोजणी यंत्रे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे १०० टक्के पारदर्शकता आणली. शेतकरी दूध घालताच त्यांच्या मोबाईलवर दुधाचे प्रमाण व दराचा डिजिटल संदेश पाठवला जातो, तसेच संगणकाद्वारे अचूक बिलिंग सिस्टिम कार्यरत केली आहे. प्रत्येक १० दिवसांनी दुधाचा पगार थेट शेतकऱ्यांच्या हाती दिला जातो. रविवारीही पगार कधीही थांबत नाही. याशिवाय वर्षभराच्या दूध संकलनावर शेतकऱ्यांना वार्षिक बोनसही दिला जातो. शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांसाठी मोफत पशुवैद्यकीय सेवा आणि माफक दरात दर्जेदार पशुखाद्याचा पुरवठा केला जातो. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ते नियमित बैठका घेतात.

सामाजिक बांधिलकी

गणेश घाडगे हे केवळ एक यशस्वी व्यावसायिक नाहीत, तर अत्यंत कष्टाळू, नम्र, समाधानी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना महाराष्ट्राची शान असलेल्या ‘खिलार गायी’ जोपासण्याची प्रचंड आवड आहे. त्यांनी या देशी गोधनाचे जतन केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याची त्यांची वृत्ती आहे. गावातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांत ते नेहमी अग्रभागी राहून योगदान देतात.

यशामागील भक्कम आधारवड

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी हा व्यवसायाचा वटवृक्ष उभा केला आहे. या संपूर्ण संघर्षात त्यांचे वडील सुभेदार विलासराव घाडगे आणि मातोश्री सुरेखा घाडगे यांचे आशीर्वाद व पाठबळ सदैव त्यांच्यासोबत राहिले, तसेच ग्रामदैवत श्री गणेशाची कृपा, ग्रामस्थ, मित्रपरिवार, संपूर्ण घाडगे कुटुंब आणि त्यांचा मुलगा हर्ष घाडगे व मुलगी तन्वी घाडगे यांच्या विश्वासावर आणि सहकार्यावर गणेश घाडगे यशाची नवनवीन शिखरे सर करत आहेत.

.................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com