

निगडी, ता. ५ ः निगडी प्राधिकरण येथील वीर सावरकर उद्यानातील गणेश तलावामध्ये कासव, साप व काही मासे मृत झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या तलावात काही विषारी घटक मिसळत असल्याने पाणी दूषित होऊन हा प्रकार घडला असावा, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच पर्यावरणाबाबत महापालिका प्रशासन फारसे गंभीर नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी फिरण्यास आलेल्या नागरिकांच्या असे लक्षात आले की गणेश तलावातील पाण्याच्या कडेला कासव, काही साप मरून पडले आहे. तसेच पाण्यातील मासे तडफडत आहेत. याबद्दल नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. पर्यावरणातील प्रत्येक घटक अनमोल असताना अशा प्रकारे जलचरांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्याचा विचार गांभीर्याने होण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. तलावामध्ये साचलेला गाळ व येणारे दूषित पाणी व त्यातून तलावातील जलचरांना होणारा धोका याचा प्रशासनाने वेळीच विचार करावा, असे मतही नागरिकांनी व्यक्त केले.
गणेश तलावात कासव, साप, काही मासे मृत पडले होते. या घटनेबाबत पर्यावरण विभागालाही कळविले आहे. महापालिका उद्यान विभागातील वरिष्ठांच्या सूचनेनुसार मृत जलचर दफन केले. कोणत्या कारणाने जलचर मृत झाले ते सांगता येत नाही.
- सुनील दुदुस्कर, उद्यान निरीक्षक, पिंपरी चिंचवड महापालिका
गणेश तलावातील पाण्याचे नमुने घेतले आहेत. त्याच्या तपासणीचे निष्कर्ष अजून हाती आलेले नाही. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याबद्दल अधिक माहिती देता येईल.
- पंकज धेंडे, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
गणेश तलावामध्ये प्रचंड गाळ साचला असून त्याची वेळेत साफसफाई होत नाही. सर्व बाजूने कचरा साचलेला आहे. दूषित पाणी, गाळ आणि पाण्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेने जलचरांना धोका होत असावा. पर्यावरणपूरक काम न झाल्यामुळे जलचरांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाण्यावर तवंग तरंगताना दिसत आहेत. या तलावाची नियमित स्वच्छता आणि योग्य ती देखभाल होणे गरजेचे आहे.
- सूर्यकांत मुथियान, पर्यावरणप्रेमी
जलचर संवर्धनाची गरज
निगडी प्राधिकरणातील गणेश तलावात कासव, साप आणि मासे मृतावस्थेत आढळल्याची घटनेची सखोल चौकशी करावी. जलचरांचे संरक्षण आणि तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.