

पिंपरी, ता. १६ : गणेशोत्सवाच्या काळात उत्साहात एकत्र येणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेश मंदिर स्थापनेला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण होत असून, गणेशोत्सवापुरते मर्यादित राहणारे मंडळाचे कार्य वर्षभर सुरू ठेवण्यास मदत होत आहे.
पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, चिखली, तळवडे, भोसरी, दिघी, कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, हिंजवडी, थेरगाव, वाकड, रावेत, रहाटणी, काळेवाडी आदी भागांतील मंडळांकडूनही गणेश मंदिरे स्थापन करण्यात आली आहेत. या मंडळांकडून दरवर्षी गणेशोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, उत्सव संपल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांचा नियमित संपर्क कमी होतो. दरम्यान, गणपती मंदिर स्थापना केल्यास दररोज पूजा-अर्चा, आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजनही केले जात आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम घेण्यावर भर दिला जातो.
कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण अन् सामाजिक बांधिलकी
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने सहभागी होणारे तरुण वर्षभर विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे मंडळाची सामाजिक बांधिलकी वाढण्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि एकजूट निर्माण होण्यास मदत होत आहे.
उत्सवाला धार्मिक अधिष्ठान
गणेशोत्सव हा केवळ देखावे, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता त्याला धार्मिक अधिष्ठान आहे. कायमस्वरूपी मंदिरात गणेशमूर्तीची स्थापना झाल्यास भाविकांना वर्षभर दर्शन व पूजाअर्चा करता येत आहे.
‘‘गणेशोत्सवापुरते मंडळाचे काम मर्यादित न ठेवता वर्षभर धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सुरू ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. मंदिराच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि नागरिकांना एकत्र आणून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर दिला जातो.
- विकास पागिरे, चिखली
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.