गोष्ट श्री गणपतीच्या नावाची

गोष्ट श्री गणपतीच्या नावाची
Published on

गोष्ट श्री गणरायाच्या नावाची
- विकट

‘‘आजी, अगं आम्ही काल जिथून ते नवरत्न मोदक आणले ना, त्या चितळ्यांच्या दुकानात एक ‘टू बिग’ (Too big) सोन्याचा मोदकही पाहिला मी. केवढा मोठा होता तो माहितीये... माझ्या तर दोन हातातसुद्धा मावला नसता. शिवाय ते दुकानातले काका म्हणाले की, तसा चांदीचाही मोदक ते करून देतील. कसलं भारी ना! आपण आणायचा आपल्या लंबोदरासाठी?’’ आजीने सांगितलेली लंबोदर नावाची गोष्ट त्याच्या लक्षात होती. ‘‘आणि तो मोदक खायचा ना आपण नंतर? कसा खायचा?’’ घरी आल्या आल्या वरदचे प्रश्न सुरू झाले. चेहऱ्यावरचा कुतूहलमिश्रित उत्साह भरलेला होता.
आजी हसली. म्हणाली, ‘‘हो, सुवर्ण आणि रजत मोदक म्हणतात त्यांना. तो आपल्या नेहमीच्या मावा मोदकाप्रमाणेच असतो. पण सोनेरी किंवा चांदीचा वर्ख लावलेला असतो त्याला. गणपतीची जेवढी विविध रूपं आहेत ना, तेवढेच वेगवेगळे हल्ली मोदक मिळतात. गणपतीच्या अनेक रूपांमध्ये तुझ्या त्या मोदकासारखा सगळ्यांत भलामोठा, प्रचंड गणपती कोण माहीत आहे का? गणपतीने विकट नावाच्या अवतारात असं भयंकर, विक्राळ रूप घेतलं होतं. विकट अवतारातल्या गणेशाचं वाहन उंदीर नसून, मयूर म्हणजे मोर आहे. तेजःपुंज असा विकट रूपातील गणपती सूर्याच्या ऊर्जेचं किंवा तेजाचं प्रतीक मानला जातो. विशाल पण विलक्षण असं श्री गणरायाचं हे रूप आहे. या नावाची गोष्टसुद्धा तितकीच विलक्षण आहे.’’
आजीची गोष्ट ऐकायला वरद सरसावून बसला.
‘‘कामासुर नावाच्या एका राक्षसाचा जन्म भगवान विष्णूच्याच एका अंशापासून झाला होता. पुढे या राक्षसाने शंकराची कठोर तपश्चर्या करून वरदान मिळवलं. मग काय तो राक्षस महाशक्तिशाली झाला. त्यातून त्या कामासुराचा अहंकार मोठा झाला. त्याला गर्व झाला. आपणच त्रिलोकीचे राजे असल्याच्या थाटात तो वावरत असे. त्याने देवी-देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली. सगळ्या पृथ्वीवर कामासुराचा प्रभाव निर्माण झाला आणि त्यातून अविवेकी प्रजा निर्माण झाली. पृथ्वीवरचा धर्म नष्ट व्हायच्या मार्गाला लागल्यावर सर्व देव एकत्र येऊन कैलासावर शंकराकडे गेले. शंकराच्याच वराने उन्मत्त झालेल्या कामासुराचा अहंकार नष्ट करण्याची जबाबदारी मग गणपतीने घेतली. श्रीगणेशाने महाविक्राळ असं विकट रूप धारण केलं आणि मोरावर स्वार होऊन कामासुराशी दोन हात केले. त्या राक्षसाचा अहंकार ठेचून काढला आणि त्याच्या जाचातून सर्वांना मुक्त केलं.’’
‘‘विशाल अशा विकट रूपातूनही श्री गणरायाने त्याला शरण आलेल्या भक्तांचं रक्षण केलं. संकटाचा विनाश केला. पण वरद आताच्या काळातही कामासुर आहे बरं! तो कोण माहीत आहे का? माणसाच्या मनातले वाईट विचार, इच्छा, अहंकार, मोह, हट्ट... म्हणजेच कामासुर राक्षस. मग आपल्या मनातल्या या कामासुराचा श्री गणरायाने नाश करावा म्हणून त्याची प्रार्थना करा बरं आता.’’ (क्रमशः)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com