

पुणे, ता. ३० : राजभवनासमोर (लोकभवन) झालेल्या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने शुक्रवारी रात्री गणेशखिंड रस्त्यावरून औंधच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. तत्पूर्वी या रस्त्यावरून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांचा ताफा जाणार असल्यानेही वाहतूक कोंडीत भर पडली. परिणामी पिंपरी-चिंचवड, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना त्याचा फटका बसला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातून औंधच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास राजभवनासमोरील रस्त्यावर अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनातील ऑईल रस्त्यावर सांडल्याने दुचाकी वाहने घसरून पडण्याची शक्यता होती. त्यामुळे चतुःश्रृंगी वाहतूक शाखेने गणेशखिंड रस्त्यावरून औंध, पिंपरी-चिंचवड व मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकात थांबविली. त्यानंतर पोलिसांकडून ऑईल सांडलेल्या ठिकाणी माती टाकण्यास सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, गणेशखिंड रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये सेनापती बापट रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांची भर पडली. तसेच, बाणेर व पाषाणवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडीत भर पडली. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होती, त्यामुळे वाहनचालक चांगलेच त्रस्त झाले. रस्त्यावर माती टाकल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या वाहनांचा ताफा या रस्त्याने जात असल्याने वाहतूक संथ झाली होती.
राजभवनासमोर झालेल्या अपघातात ऑईल सांडले होते. खबरदारी म्हणून वाहतूक थोड्या वेळ थांबविण्यात आली होती. ऑईलवर माती टाकून रस्ता थोड्या वेळात पूर्ववत सुरू करण्यात आला.
- राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, चतुःश्रृंगी वाहतूक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.