गणेशमुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वरुणराजाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

गणेशमुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वरुणराजाची हजेरी

पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. बुधवारी (ता.३१) दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाल्यामुळे पोषक पावसाला हवामान निर्माण झाले. त्यामुळे राज्यातही अनेक भागांत विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता कायम आहे.

काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने गणेशोत्सवाच्या पुर्वसंधेला मंगळवारीच (ता.३०) शहर व परिसरात हजेरी लावली. गणेश मुर्ती स्थापनेलाही वरुणराजाने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात दिवसभरात सर्वाधिक पाऊस मगरपट्टा परिसरात २१.५ मिलिमीटर पडला, तर शिवाजीनगर परिसरात ४.५ मिलिमीटर पावसाने हजेरी लावली. शनिवार (ता.३) आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. दक्षिण तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून अंतर्गत कर्नाटक, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र ते मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून, विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली असतानाच, अनेक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह वळीव स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे अतिवृष्टी होऊन तिथे १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.