

वाल्हे, ता. ४ : पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील गायकवाडमळा येथे भाजीपाला विक्रीसाठी पुण्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या मायलेकाने प्रसंगावधान दाखवत पाच सशस्त्र चोरट्यांचा हल्ला परतवून लावला. चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांवर घरातील वस्तू फेकत प्रमोद गायकवाड यांनी त्यांना पिटाळून लावले. या धाडसी प्रतिकारामुळे मोठा अनर्थ टळला.
येथील गायकवाडमळा येथे शुक्रवारी (दि. ४) पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास ही थरारक घटना घडली. प्रमोद गायकवाड हे गेल्या चार वर्षांपासून पुणे बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते आईसमवेत वाहनात भाजीपाल्याचे कॅरेट भरत होते. त्या वेळी प्रमोद मेथीची भाजी पोत्यात भरण्यासाठी आतल्या खोलीत होते, तर त्यांची आई कोथिंबिरीचे पोते घेऊन बाहेर येत होती. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून तोंडाला रुमाल बांधलेले चोरटे घरात शिरले.
हातात चाकू घेतलेल्या चोरट्यांना पाहून आईने आरडाओरडा करताच त्यांनी तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. आईची किंकाळी ऐकून प्रमोद बाहेर आले आणि त्यांनी डोक्यावरील मेथीच्या भाजीचे पोते थेट चोरट्यांच्या अंगावर फेकले. या अनपेक्षित हल्ल्याने चोरट्यांनी आईला सोडून प्रमोद यांच्यावर मोर्चा वळवला. प्रमोद यांनी प्रसंगावधान दाखवत घरातील वजनकाटा, रिकामे कॅरेट आणि स्टूल अशा वस्तूंचा वापर करत प्रतिकार सुरू ठेवला. एका चोरट्याने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, प्रमोद यांनी लहान टेबलचा ढाल म्हणून वापर करत वार चुकवला. प्रमोद यांच्या धाडसी प्रतिकारामुळे भांबावलेल्या चोरट्यांनी घराबाहेर पळ काढला. त्यांनी तत्काळ दरवाजा आतून बंद करून घेतला. या झटापटीत प्रमोद किरकोळ जखमी झाले असून, मायलेकाच्या धाडसामुळे मोठी जीवित व वित्तहानी टळली.
सुकलवाडीतही दिवसा घरफोडीचा प्रयत्न
शुक्रवारी दुपारी सुकलवाडी (ता. पुरंदर) येथे लक्ष्मण राजाराम पवार यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न झाला. मात्र, कुलूप न तुटल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सरपंच संदेश पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.