गंगापूर धरण एअर शो उत्साहात
गंगापूर धरणावर आकाशात साकारला तिरंगा
सूर्यकिरण पथकाच्या कसरतींनी नाशिककर भारावले
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : गंगापूर धरणाच्या निळ्याशार जलाशयावर आकाशात साकारलेल्या तिरंगा ध्वजाचे प्रतिबिंब पाण्यावर उमटले आणि उपस्थितांचा श्वास क्षणभर थांबला. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण पथकाने सादर केलेल्या चित्तथरारक हवाई कसरतींनी गंगापूर परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात नाशिककरांनी देशासाठी जीवन अर्पण करणाऱ्या या वीरांचे उत्स्फूर्त कौतुक केले.
भारतीय हवाई दल आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी गंगापूर धरण परिसरात या हवाई कसरतींचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
गंगापूर धरणाच्या साक्षीने सूर्यकिरण पथकाने सुमारे अर्धा तास थरारक प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी पथकातील नऊ विमाने एकाच वेळी सूर्यकिरणाप्रमाणे विभक्त झाली. विमाने वेगळ्या मार्गावर जात असतानाच आकाशात तिरंगा ध्वज साकारण्यात आला. हे नेत्रदीपक दृश्य उपस्थितांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले. विविध कसरतींतून पथकाने नागरिकांच्या मनात देशभक्तीच्या भावनांना व्यापक रूप दिले. कार्यक्रमस्थळी उपस्थितांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी पोलिस बँडने देशभक्तिपर धून सादर केल्या. देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या चेतनेने भारून गेला.
यांनी केले सारथ्य
सूर्यकिरण पथकाचे नेतृत्व करणारे ग्रुप कॅप्टन अजय दशरथी यांनी कॉकपिटमधून ‘नमस्कार नाशिककर, खूप खूप आभारी आहोत,’ असा संदेश दिला. या वेळी संजीव सिंह, ललित वर्मा, संजीव दयाळ, तेजेश्वर सिंह, जसदीप सिंह, अंकित वसिष्ठ, दिवाकर शर्मा, श्री. विष्णू आदी वैमानिकांनी विमानांचे सारथ्य केले. फ्लाइट लेफ्ट. कवल संधू यांनी विमानांची तांत्रिक माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

