esakal | Pune : गंगोत्री एकवर फडकविला तिरंगा
sakal

बोलून बातमी शोधा

pune

गंगोत्री एकवर फडकविला तिरंगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरातील ‘गंगोत्री १’ या तीन हजार ६७२ मीटर उंच शिखरावर गिरिप्रेमीच्या महिला गिर्यारोहक पूर्वा शिंदे (सिंह) आणि स्नेहा तळवटकर या दोघींनी यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा फडकावला. यासाठी त्यांना ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन मिळाले.

गंगोत्री परिसरात गंगोत्री शिखर समूह आहे. या समूहात ‘गंगोत्री १’, ‘गंगोत्री २’ आणि ‘गंगोत्री ३’ या शिखरांचा समावेश होतो. त्यापैकी गंगोत्री १ हे सर्वांत उंच असून, चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीमध्ये गणले जाते.

या मोहिमेमध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्नेहा तळवटकर, रितू चावला, डॉ. सुनीता कोळके, हेमांग तन्ना यांनी सहभाग घेतला होता. मात्र, प्रतिकूल हवामान, सततची बर्फवृष्टी, वेगवान वारे यामुळे संघाचा वेग कमी कमी होत होता आणि दुप्पट ताकदीने पुन्हा सुरवात करावी लागत होती. त्यामुळे यातील काहींना मोहिमेतून परतावे लागले. ही मोहीम सलग २५ दिवस चालली. या परिस्थितीतही खूप जिद्दीने या दोन महिलांनी शिखर माथा गाठण्यात यश मिळविले.

संस्थेच्या वतीने महिला गिर्यारोहकांसाठी ‘गुरुकुल’ ही संकल्पना राबविण्यात आली. यामध्ये राज्यातील विविध भागातून १५ महिलांना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले व त्यांचे दोन संघ तयार करण्यात आले. यातील पहिल्या संघाच्या जुलै-ऑगस्ट मधील ‘कांग्यात्से १ व २’ या यशस्वी शिखर मोहिमेनंतर, दुसऱ्या महिला संघाने तांत्रिक दृष्ट्या अत्यंत अवघड अशा शिखरावरची मोहीम यशस्वी केली.

loading image
go to top