गोष्ट गणरायाच्या नावाची वरदविनायक

गोष्ट गणरायाच्या नावाची
वरदविनायक
Published on

गणपती येणार म्हणून आठवडाभर घरात लगबग सुरू होती आणि वरदच्या मनात प्रचंड उत्साह भरलेला होता. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच वरदचे आजी-आजोबाही घरी राहायला आले, त्यामुळे तर स्वारी अगदी खुशीत होती. त्यात आजीने वरदसाठी चॉकलेट मोदक आणले होते. ‘गणरायासाठी चितळ्यांचे मावा मोदक आणि घरच्या आमच्या लाडोबा गणोबासाठी खास चॉकलेट मोदक’, असं म्हणत वरदच्या हातात आजीने मोदक ठेवले.
‘‘म्हणजे उद्या गणरायासमोर ते मोदक. पण हा लाडोबा गणोबा कोण? आणि मग मला काय खाऊ आणलास?’’ वरदने विचारल्यावर आजी-आजोबा हसले.
‘‘अरे आमच्या घरचा लाडोबा गणपती तूच. तुझंच तर नाव ना ते गणोबा! विसरलास?” मग वरदच्या डोक्यात प्रकाश पडला. वरद हे गणपतीचं नाव हे त्याला माहीत होतं. ‘‘बरं झालं. मग हे चॉकलेट मोदक फक्त माझे. कारण माझं नाव गणपतीचंच आहे,’’ हे ऐकताच आई किचनमधून हसत बाहेर आली.
‘‘वरद तू नावाचं लॉजिक लावलंस तर मोठा वाटा बाबाला द्यावा लागेल बरं का! त्याचं नावही गणपतीच्याच एका नावांपैकी एक आहे, माहितीय का?’’
‘‘आणि मी? तू मला नाना आजोबा म्हणत असलास तरी माझं नाव गणेश आहे, हे विसरलास काय वरद?’’
‘‘गणेश, अमेय, वरद.... आणखी किती नावं आहेत विघ्नहर्त्याची?’’ वरदने आजोबांकडे पाहिलं.
‘‘शेकडो नावं आहेत बेटा. १०८ नावं तर स्तोत्रांसह पाठ आहेत तुझ्या आजीची.’’
‘‘वरद, चल आजपासून दररोज एकेक नाव आणि त्यामागची कहाणी सांगते.’’
‘‘सुरुवात तुझ्या नावापासून करू या का?’’, आजीने विचारल्यावर आता रोज गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून तो उत्साहात आत गेला.
‘‘वरद म्हणजे वरदविनायक. आपल्या अष्टविनायकांपैकी महडचा गणपती म्हणजे वरदविनायक. वर देणारा, भाविकांची इच्छा पूर्ण करणारा तो वरदविनायक. आपण गेल्यावर्षी गेलो होतो ते अष्टविनायकाचं स्थान आठवतंय? प्राचीन काळचं पुष्पकम् अरण्य म्हणजे सध्याचं महड आहे ना तिथे तेव्हा जंगल होतं त्याच ठिकाणी गृत्समद नावाच्या ऋषींनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली. विनायक प्रसन्न झाला आणि हवा तो वर दिला.
‘तू याच वनात कायम राहावंस आणि भाविकांच्या इच्छा पूर्ण कराव्यास’, असा वर ऋषींनी मागितला. तथास्तु! गणराय म्हणाले. मनापासून आराधना करणाऱ्या सर्वांना हा गणराय हवा तो वर देतो म्हणून तो वरद... वरदविनायक झाला.’’
वरदला आपल्या नावाची गोष्ट ऐकून भलताच आनंद झाला.
‘‘आजी, आणखी अशीच इंटरेस्टिंग गोष्ट सांग ना...’’
‘‘आता झोप. उद्या तुला गणेश चतुर्थीचीच गोष्ट सांगते एकदंत नावाची.’’
(क्रमशः)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com