संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा
Published on

‘सखी संघम’तर्फे ‘गर्भसंस्कार’वर मार्गदर्शन
सोलापूर : पद्मशाली सखी संघमच्या वतीने २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मार्केट यार्ड येथील रेनबो प्री-प्रायमरी स्कूलमध्ये महिलांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी डॉ. नम्रता गुल्लापल्ली (बिंगी) ‘गर्भसंस्कार’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. विनायक बंकापूर, चन्नवीर बंकुर, ज्ञानेश्वर जाधव आणि संगीता कोरे हे विविध सरकारी योजनांची माहिती देतील. सर्व समाजांतील महिलांसाठी हा उपक्रम खुला आहे. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सखी संघमच्या अध्यक्षा भाग्यलक्ष्मी तुम्मा व सचिवा ममता तलकोकूल यांनी केले.
---
शनिवारी ‘सूर काही राहिले’ कार्यक्रम
सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद (दक्षिण सोलापूर) आणि वेणुगोपाल संगीतालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘सूर काही राहिले’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २२) सायंकाळी ६.२५ वाजता लोकमान्य टिळक सभागृहातील ॲम्फी थिएटरमध्ये कार्यक्रम होणार आहे. रूपक कुलकर्णी, स्वरदा मोहोळकर आदी कलाकार गायन सादर करतील. झंकार कुलकर्णी साथसंगत करणार असून आदिती कुलकर्णी सूत्रसंचालन करतील. रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
‘काडादी’च्या एनसीसी सैनिकांना शिष्यवृत्ती
सोलापूर : केएलई सोसायटी संचलित अण्णप्पा काडादी हायस्कूलच्या ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिटमधील पल्लवी मिनकेरी व आकांक्षा गुरुविनमठ या छात्र सैनिकांना सीडब्ल्यूएसअंतर्गत प्रत्येकी सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. या कामगिरीबद्दल चीफ ऑफिसर सिद्रामप्पा तंबाके व ऊर्मिला गिडवीर यांचा उपमुख्यमंत्री कार्यालयातील मंगेश चिवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छात्र सैनिकांच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सिंधूताई काडादी व मुख्याध्यापिका राजश्री तावशे यांनी अभिनंदन केले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाचे शाळेत स्वागत करण्यात आले.
---
‘ओबीसी’तर्फे आज ‘जात पडताळणी’ला निवेदन
सोलापूर : बहुजन-ओबीसी आरक्षणावरील अतिक्रमण व कायदेशीर प्रश्नांवर सोलापुरात झालेल्या बैठकीत विविध ओबीसी नेत्यांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार केला. शेखर बंगाळे, पंचप्पा धनशेट्टी, लक्ष्मण भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. कुणबी प्रमाणपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याच्या मागणीसाठी बुधवारी (ता. १९) सकाळी १० वाजता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहापासून सामाजिक न्याय भवनातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयावर निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. ओबीसी समाजातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
उत्कर्ष वाचनालयातर्फे कवी संमेलन उत्साहात
सोलापूर : कर्णिक नगर येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालय, ज्येष्ठ नागरिक संघ आणि तेलुगु- मराठी साहित्यिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त कवी संमेलन झाले. डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमापूजन करण्यात आले. कवी नरेंद्र गुंडेली अध्यक्षस्थानी होते, तर दस्तगीर जमादार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनात कवींनी देशभक्तिपर तेलुगु व मराठी कवितांचे सादरीकरण केले. विविध विषयांवरील कवितांना उपस्थित रसिकांनी दाद दिली. नरेंद्र गुंडेली यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय इंगळे यांनी आभार मानले. यावेळी साहित्यप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
किमान वेतनासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
सोलापूर : विडी कामगारांसाठी कामगार मंत्र्यांनी जाहीर केलेल्या ३७९ व ३६१ रुपयांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी विडी कामगार किमान वेतन हक्क समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहे. डॉ. गोवर्धन सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत मालक वर्गाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस २० ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार असून, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीस समितीचे निमंत्रक विष्णू कारमपुरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
............
PNE26W42858
सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करताना ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज.
---
वारकरी मंडळातर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार
सोलापूर : आषाढी एकादशी वारी सोहळ्यात भाविकांसाठी उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या हस्ते हा सत्कार झाला. या वेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी व दिनकर देशमुख उपस्थित होते. जोतिराम चांगभले, बळिराम जांभळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारीही उपस्थित होते. वारीदरम्यान भाविकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे कौतुक केले.
---
PNE26W42859
ऋतुजा वेदपाठक
---
युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत वेदपाठकला सुवर्णपदक
सोलापूर : पार्क स्टेडियम येथे झालेल्या जिल्हास्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत हिंगुलांबिका प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी ऋतुजा वीरेंद्र वेदपाठक हिने सुवर्णपदक मिळविले. लहान वयात तिने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेत तिचे कौतुक करण्यात आले. ऋतुजाच्या कामगिरीबद्दल बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापू ढगे, सचिव विजय पुकाळे आणि मुख्याध्यापक प्रमोद हंचाटे यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com