
उद्यानांमुळे पुणे शहरांच्या सौंदर्यात भर पडते. रोज अनेक नागरिक, लहान मुले खेळण्यासाठी उद्यानामध्ये जात आहेत.
पुण्यातील सौंदर्यात भर टाकणारी उद्यानेच कुरूप!
पुणे - उद्यानांमुळे (Garden) पुणे शहरांच्या (Pune City) सौंदर्यात (Beauty) भर पडते. रोज अनेक नागरिक, लहान मुले खेळण्यासाठी उद्यानामध्ये जात आहेत. पण जशी उद्यानांची संख्या वाढत आहे, तशी त्यांची देखभाल करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. उद्यानांमध्ये स्वच्छतेचा अभाव, बंद पडलेले सीसीटीव्ही, खराब झालेले पाण्याच्या पाण्याचे आरओ यासह अनेक असुविधांनी उद्यानांना ग्रासले आहे. उद्यानांसाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे देखभाल करणे तारेवरची कसरत होत आहे.
सारसबाग समस्यांच्या गर्तेत
शहरातील सर्वांत जुनी बाग अशी सारसबागेची ओळख
१७५० मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्याकडून निर्मिती
पुणे महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पुणे महापालिकेकडून या उद्यानाची देखभाल दुरुस्ती सुरू
दिवसभरात किमान तीन हजार नागरिक भेट देतात
सध्या सारसबाग समस्यांच्या गर्तेत
कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये कागद, पाण्याच्या बाटल्या, कागदी कप असा कचरा जमा
कचऱ्याचे बकेट तुटल्याने त्यांचा वापर होत नाही
सीसीटीव्ही तुटल्याने बंद
पिण्याच्या पाण्याची आरओ मशिन बंद
स्वच्छता गृहातील तुटलेले नळ व अस्वच्छता गंभीर
टगेगिरी करणारे तरुणांची सुरक्षाा रक्षकांसोबत ओळख असल्याने थेट आतमध्ये गाडी घेऊन दुचाकीवरून फिरतात
२०४ : महापालिकेची शहरात उद्याने
६०० एकर : उद्यानांचे एकूण क्षेत्रफळ
१.५ लाख रोज भेट देणारे नागरिक
३५० महापालिकेकडील कर्मचारी संख्या
१८ कोटी देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला तरतूद
६० उद्याने ठेकेदारी पद्धतीने देखभाल
७ उद्याने सीएसआरच्या माध्यमातून
१४० उद्याने पालिकेच्या उद्यान विभागाकडून देखभाल
महागड्या उद्यानात तुटलेली घरे
महापालिकेने पाषाण येथील सोमेश्वरवाडी येथे कै. संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान विकसित केले आहे. हे पुण्यातील सर्वांत महागडे म्हणजे तब्बल ५० रुपये शुल्क असलेले उद्यान आहे. खेडे गावातील संस्कृती व्यवहार देखाव्यांमधून दाखविण्यात आले आहे. पण त्याची देखभाल केली जात नसल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. घरावरची कौले तुटलेली आहेत. आतमध्ये कचरा, जाळ्या झालेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून पैसे घेतले जात असले तरी त्यांना तुटके फुटके व अस्वच्छ उद्यान बघावे लागत आहे. हे उद्यान ठेकेदाराकडून चालविले जात असल्याने महापालिका प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही तसेच त्याने उद्यान स्वच्छ ठेवावे यासाठीही दुर्लक्ष केले जात आहे.
पु. ल. देशपांडे उद्यानाला पसंती
पुणे महापालिकेने ४० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर पु. ल. देशपांडे उद्यान उभारले आहे. जपानी संस्कृतीचे हे उद्यान असूनदेखील देखभाल उत्तम पद्धतीने केली जात आहे. तसेच सुरक्षाव्यवस्था चांगली असल्याने तेथे उद्यान सुस्थितीत आहे. कचराही होत नाही. हे उद्यान पाहण्यासाठी नागरिकांकडून पसंती मिळत आहे.
उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे उद्यानांमधील कामे करून घेतली जात आहेत. उद्यानांमधील पिण्याच्या पाण्यासाठी बसवलेले आरओ बंद पडले आहेत, त्याची दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच उद्यानांच्या शेजारी झोपडपट्टी असेल तर तेथे दारू पिऊन बाटल्या आतमध्ये टाकणे, कचरा करणे अशा घटना घडत आहेत. तेथे सुरक्षा रक्षकांनाही मारहाण होत असल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.
- अशोक घोरपडे, उद्यान अधिक्षक, महापालिका
आपले अनुभव कळवा...
शहरातील उद्यानात गेल्यानंतर आलेले अनुभव व तेथील समस्या सोडविण्यासाठी सूचना याबाबत आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
Web Title: Garden That Adds To The Beauty Of Pune Is Ugly
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..