लक्ष्मीच्या पावलांनी येणार उद्या (गुरुवार) गौराई

लक्ष्मीच्या पावलांनी येणार उद्या (गुरुवार) गौराई
Published on

सोनपावलांनी उद्या घरोघरी येणार गौराई

स्वागतासाठी महिलांकडून तयारीला वेग; आवश्‍यक साहित्‍य खरेदीसाठी गर्दी

सातारा, ता. १५ : सोनपावलांनी, धनधान्याच्या अन्‌ लक्ष्मीच्या पावलांनी गुरुवार (ता. १७) घरोघरी लाडक्या गौराईचे आगमन होणार असून, तिच्या स्वागतासाठी समस्त महिला सज्ज झाल्या आहेत. तिच्या स्वागतात कोणतीही कमी राहू नये, यासाठी महिलांची लगबग सुरू आहे.

नागपंचमी, नवरात्राप्रमाणेच गौराईचा सण हा महिलांच्या जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे गणेशाच्या पाठोपाठ येणाऱ्या गौराईच्‍या स्वागतासाठी महिलांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. गणरायाप्रमाणेच गौरीसाठीही मोठी सजावट केली जाते. आपली गौराई देखणी असावी, तिला खूप सजविण्यासाठी महिलांचा आटापिटा सुरू असतो. त्यामुळेच गेले आठ दिवस बाजारपेठेत महिला गौराईचा मुखवटा चोखंदळपणे निवडताना आढळत होत्या. आजही बाजारपेठेत मुखवटे खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणपती शेजारीच महिला गौराईची प्रतिष्ठापना करतात. पारंपरिक पद्धतीने त्यांना बसवितानाचा तिला अनेक रूपे देण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. काही गौराई जात्यावर दळताना तर काही महिला झुल्यावरही बसविल्या जातात. अशा सजावटी करण्याच्‍या नियोजनात महिला सध्या गुंतल्या आहेत.
आगमनादिवशी गौराईला भाजी- भाकरीचा नैवेद्य करतात. शापूची आणि भोपळ्याच्या पानांची भाजी तर कालपासूनच मंडईत विक्रीसाठी आली आहे. आकाराप्रमाणे १० ते २० रुपयास पेंडी याप्रमाणे ही भाजी विकली जात आहे.
दुसरे दिवशी गौराईस पोळ्यांचा नैवेद्य केला जातो. या दिवशी गौराईस विविध प्रकारचे वाण ठेवले जातात. तिच्या फराळासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांबरोबरच मिठाईही गौराईसाठी ठेवली जाते. बहुतेक महिला हे पदार्थ घरी तयार करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे घराघरांतून फराळाच्या पदार्थांचा दरवळ सुटू लागला आहे. मात्र, ज्‍या महिलांना पदार्थ घरी तयार करणे शक्य होत नाही, अशा महिला बाजारपेठेतून तयार पदार्थ आणि मिठाई आणतात. त्‍यामुळे मिठाईची दुकाने फराळाच्या तयार पदार्थांनी आणि विविध पदार्थांनी सध्या भरून गेली आहेत.
याशिवाय गौराईच्‍या सजावटीसाठी लागणाऱ्या बोरमाळेपासून कोल्हापुरी साजापर्यंतचे कलात्मक आणि स्वस्त दागिने अगदी फुटपाथवरही विक्रीस उपलब्‍ध झाले असून, त्‍याच्‍या खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढली आहे.
............................

चौकट

गौरी आगमन मुहूर्त

गौरी आगमन (गुरुवार, ता. १७)
सकाळी साडेसहा ते आठ
सकाळी ११ ते दुपारी दीड
दुपारी साडेचार ते सायंकाळी सात
................
गौरी विसर्जन
शनिवार (ता. १९)
सकाळी आठ ते नऊ
दुपारी दीड ते चार
ः अनामिका मालपुरे, ज्योतिष विशारद, सातारा
.............
फोटो : तारखेत सेव्‍ह
सातारा ः लाडक्या गौराईचा मुखवटा खरेदी करण्यासाठी महिलांची झालेली गर्दी. (नरेंद्र जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)
..............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com