
गायत्री जगताप ही आठ वर्षांची मुलगी तिच्या एकपात्री नाट्यप्रयोगांच्या जगात दंग असते. त्यात ती कधी स्वप्नांच्या जगात तर कधी एखाद्या छोट्याशा गावात गेलेली असते. काही वेळा पाणी वाचवायचं आवाहन करत असते आणि कधी-कधी संग्रहालयातली गाइड होऊन माहिती देते. तिचे अनुभव, कल्पना, शब्दभांडार आदींचं लोभस दर्शन तिच्या अभिव्यक्तीतून बघणाऱ्याला सुखावून जातं.
गायत्री जगताप ही आठ वर्षांची मुलगी तिच्या एकपात्री नाट्यप्रयोगांच्या जगात दंग असते. त्यात ती कधी स्वप्नांच्या जगात तर कधी एखाद्या छोट्याशा गावात गेलेली असते. काही वेळा पाणी वाचवायचं आवाहन करत असते आणि कधी-कधी संग्रहालयातली गाइड होऊन माहिती देते. तिचे अनुभव, कल्पना, शब्दभांडार आदींचं लोभस दर्शन तिच्या अभिव्यक्तीतून बघणाऱ्याला सुखावून जातं.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गायत्रीचं घर आहे एरंडवणा येथील अग्निशमन दलाच्या केंद्रात. येथील स्टेशन ड्यूटी ऑफिसर राजेश जगताप यांची ती धाकटी मुलगी. तिची मोठी बहीण गौरी ही आठवीत गेली आहे आणि गायत्री तिसरीत. या केंद्रात अग्निशमन दलाच्या कार्य व साहित्याची माहिती देणारं तीनमजली संग्रहालय आहे. विविध शाळांमधील विद्यार्थी हे संग्रहालय पाहायला येतात.
गायत्रीने तिच्या बाबांना इतक्यांदा माहिती देताना पाहिलं आहे की, बऱ्याचशा साहित्याची माहिती ती स्वतः व्यवस्थित सांगू शकते. यावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोगात ती गाइड होते. आग विझविण्यासाठी पूर्वी वापरलं जायचं ते भलंमोठं वाहन इथं आहे. गायत्री त्याबद्दल सांगते, ‘‘ही बघा, लाल परी. ही गाडी १९५६ची आहे. ती १९७२ पर्यंत काम करत होती. ही अजूनही चालू आहे.’
गायत्री म्हणाली, ‘घरी माझे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक आले की, मी नवीन तयार केलेलं नाटुकलं त्यांच्यासमोर सादर करते. ही मंडळी आधी केव्हा तरी पाहिलेल्या एखाद्या नाटुकल्याची फर्माईशसुद्धा करतात. वेगळा विषय निवडायचा, मग त्यावर काय बोलायचं, त्याची तालीम करायची; असं माझं सारखं चाललेलं असतं. इथल्या एखाद्या झाडाखाली, ओट्यावर किंवा घरात माझा हा सराव करण्यात वेळ कुठे जातो, ते समजतच नाही. माझी बहीण गौरी कधी-कधी विषय सुचवणं, लेखन करणं आणि दिग्दर्शन करणं अशी मदत करते. आम्ही दोघी पंडिता शमा भाटे यांच्याकडे कथक नृत्य शिकतो.
नाटुकलं लिहिलेली पुस्तकंही असतात, पण मला स्वतःला लिहायला आवडतं. माझं मी लिहिलेलं लवकर पाठ होतं. मला कोणते विषय आवडतात, ते बहिणीला माहीत आहे. त्यामुळे तीसुद्धा तसेच विषय निवडून लेखन करून देते.’
गायत्रीच्या बाबांनी सांगितलं की, या दोघी बहिणी कलेच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकतात. नवं काही तरी शोधून सकारात्मकपणे अभिव्यक्ती करतात. स्वतः आनंदात राहतात आणि इतरांमध्ये आनंद वाटतात, याचा मला फार अभिमान वाटतो.