
पुणे - सिंहगड रस्ता परिसरात पुन्हा एकदा गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये सध्या तिघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्यामध्ये दूषित पाण्यामुळे जीबीएस झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी पुरवठा विभागाला पत्र लिहून या भागातील पाण्याची तपासणी करावी आणि शुद्ध पाणी पुरवठा करावे अशी सूचना केली आहे.
पुण्यात गेल्या तीन महिन्यापासून जीबीएसचे रुग्ण आढळत आहेत. यामध्ये विशेषतः धायरी, नऱ्हे, खडकवासला, नांदेड, सणसवाडी, किरकटवाडी या भागाचा समावेश आहे. जीबीएसच्या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला असून, तर अनेकांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्यांना चालणे, हाताची हालचाल करणेही अवघड होत आहे. या उपचारावर लाखो रुपयांचा खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागत आहे. त्यामुळे जीबीएसच्या आजाराबाबत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
या आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेची व राज्य सरकारची यंत्रणा जागी झाली, त्यांनी दूषित पाणी पुरवठा होऊ नये, जीबीएससाठी कारणीभूत असलेले इ कोलाय अन्य जिवाणू नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तसेच नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण आता पुन्हा एकदा जीबीएसने डोके वर काढल्याचे आरोग्य विभागाच्या पत्रावरून समोर आले आहे.
काय आहे आरोग्य विभागाच्या पत्रात
आरोग्य विभागाने पाणी पुरवठा विभागाला पाठवलेल्या पत्रामध्ये सात वर्षाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ती अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर आहेत. हा रुग्ण मानाजी नगर परिसरात राहणारी असून, त्यांच्या घरी महापालिकेतर्फे दिले जाणारे पाणी वापरले जाते.
एरंडवणे येथील रुग्णालयात रायकर मळा येथील राहणाऱ्या व्यक्तीवर उपचार सुरु असून, या रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. यांच्याकडेही महापालिकेतर्फे पाणी पुरवठा केला जातो. तर ससून रुग्णालयात एका १० वर्षाच्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. या रुग्णाच्या घरी मानाजीनगर येथील खासगी विहीर आणि गुरुराज वॉटर प्युरिफायर प्लांट येथून पाणी पुरवठा होतो.
या ठिकाणावरून पिण्यास अयोग्य पाणी दिले जात असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या भागात पुन्हा आजाराचा प्रसार होत आहे. यामुळे या पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून शुद्ध पाणी पुरवठा करावा. त्यामुळे धायरी व नऱ्हे भागात जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी असे पत्रात नमूद केले आहे. आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी हे पत्र पाठवले आहे.
‘आरोग्य विभागाकडून मिळालेल्या पत्रानुसार या भागातील पाण्याचे नमुने, रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवले जातील. तसेच आरओ प्लांट सील करण्यात येतील. या भागात शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी क्लोरिनेशन केलेले पाणी पुरविले जात आहे.’
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.