दूषित पाण्यामुळे ‘जीबीएस’चा उद्रेक राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संशोधनातून उघड

दूषित पाण्यामुळे ‘जीबीएस’चा उद्रेक
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संशोधनातून उघड
Published on: 

पुणे, ता. १८ : शहरात गेल्‍यावर्षी उद्भवलेल्या गुलियन-बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) मोठ्या उद्रेकामागे अतिसारासारख्या पोटाच्या विकारांशी संबंधित संसर्ग महत्त्वाचा घटक असल्याचे पुण्‍यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्‍ही) केलेल्‍या संशोधनातून समोर आले आहे. रुग्‍णांबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांसह सिंहगड रस्‍ता परिसरातील कुक्कुटपालन केंद्रांतील कोंबड्यांच्या विष्ठेच्या नमुन्यांतही ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ या जिवाणूचे तसेच ‘नोरोव्हायरस’चे अस्तित्व आढळल्याने यापासून हा उद्रेक झाल्‍याचा संशय व्‍यक्‍त करण्यात आला आहे. त्यामुळे संसर्गाच्या संभाव्य स्रोतांचाही शोध घेण्याचे महत्त्व संशोधकांनी अधोरेखित केले आहे.
हा मज्जासंस्थेचा एक दुर्मीळ आजार असून, सुरवातीला अतिसार व नंतर स्नायू कमकुवत होऊन अर्धांगवायू (पॅरालिसिस) सारखी लक्षणे दिसतात. हा आजार प्रामुख्याने दूषित पाणीस्रोत, अन्नाद्वारे होणारा संसर्ग तसेच प्रामुख्‍याने ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ या जिवाणू संसर्गामुळे उद्भवतो. गेल्‍यावर्षी जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत शहरात प्रामुख्‍याने सिंहगड रस्‍ता, धायरी, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी परिसरात ‘जीबीएस’चा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला होता. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), पुणे महापालिका आरोग्‍य विभाग, संसर्गजन्‍य रोग विभाग आणि ‘एनआयव्ही’ यांच्यासह विविध संस्थांमधील संशोधकांनी या उद्रेकाचा अभ्यास केला आहे. ‘एनआयव्ही’ च्‍या शास्‍त्रज्ञ डॉ. राजलक्ष्‍मी विश्‍वनाथन, डॉ. प्रज्ञा शिंदे यांच्‍यासह अनेक तज्‍ज्ञांनी केलेले हे संशोधन ‘अमेरिकन जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन अँड हायजिन या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ‘मोठ्या प्रमाणावरील सामूहिक साथ’ असे त्‍याला संबोधले आहे.
परिसरातील कुक्कुटपालनातील कोंबड्यांच्या विष्ठेत कॅम्पिलोबॅक्टर व नोरोव्हायरस आढळला. ‘जीबीएस’ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये अतिसाराचे प्रमाण लक्षणीय होते. पुण्याच्या नैऋत्य भागात सर्व वयोगटांतील व्यक्तींना या विकाराची लागण झाली होती. एकूण १९३ रुग्णांपैकी १०८ रुग्णांमध्ये संसर्गजन्य घटक आढळले. तर, १४८ रुग्णांपैकी ७२ जणांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग तर ४० जणांमध्ये नोरोव्हायरस आढळला. तसेच, पाण्याच्या २०८ नमुन्यांपैकी एका नमुन्यात कॅम्पिलोबॅक्टर, तर आठ नमुन्यांत नोरोव्हायरस आढळला. त्यामुळे दूषित पाणी आणि कोंबड्यांशी संबंधित संसर्गाची संभाव्य भूमिका तपासण्याची गरज संशोधकांनी अधोरेखित केली आहे.
.......................
संशोधनात काय आढळले?
– जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान आढळलेले जीबीएस रुग्ण ः २३०
– मृत्यू ः १२ (मृत्यूदर ५.२ टक्के)
– १४८ रुग्णांपैकी ७२ जणांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी (४८.७ टक्के)
– १८० रुग्णांपैकी ४० जणांमध्ये नोरोव्हायरस (२२.२ टक्के)
– २३० पैकी १४७ रुग्णांना पूर्वी किंवा त्याच काळात अन्य आजार झाल्याची नोंद (६३.९ टक्के)
– २०८ पाण्याच्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात कॅम्पिलोबॅक्टर, आठ नमुन्यांत नोरोव्हायरस
– कोंबड्यांच्या विष्ठेच्या ६६ पैकी २४ नमुन्यांत कॅम्पिलोबॅक्टर, पाच नमुन्यांत नोरोव्हायरस.
....................
‘‘ज्यावेळी दोनशे लोकांना जीबीएस होतो. त्यावेळी सुमारे दोन लाख लोकांना जुलाब, पोटाचे विकार झालेले असतात. त्यामुळे दूषित पाणी पिल्याने हा आजार झाला असून, पाण्याच्या स्रोतातही प्राण्यांची विष्ठा आढळल्याने या आजाराचा उद्रेक झाला. त्यामुळे हा आजार भविष्यात होऊ नये, यासाठी पाण्यांचे स्रोत शुद्ध करत राहणे आवश्यक आहे.’’
– डॉ. अमित द्रविड, संसर्गरोगतज्‍ज्ञ
...........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com