शहरांना आकार नाही, शिस्त नाही; मग ७.८ टक्के जीडीपीचं काय करायचं?

शहरांना आकार नाही, शिस्त नाही; मग ७.८ टक्के जीडीपीचं काय करायचं?
Published on: 

सामान्यांचे जीवनच उद्ध्वस्त;
‘जीडीपी’चे करायचे काय?

राज ठाकरेंचा सवाल : शहरांना आकार-शिस्त नसल्याची टीका

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : ‘‘शहर म्हणून आपण कोणतीही शिस्त पाळत नाही. पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. प्रत्येक गोष्टीचे खापर पोलिसांवर फोडले जाते. शहरांना कोणताही आकार उरलेला नाही. फुटपाथवरून चालता येत नाही अन् चांगली मैदानेही राहिलेली नाहीत. देशाचा ‘जीडीपी’ ७.८ टक्के असल्याचे सांगता; पण सामान्य माणसाचे जीवनच उद्ध्वस्त झाले असेल, तर या ‘जीडीपी’चे करायचे काय ’’ असा सवाल विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले.

नवी मुंबईत मनसे वाहतूक सेनेतर्फे आयोजित व्यावसायिक वाहन प्रदर्शन आणि भव्य वाहतूकदार मेळाव्यात राज बोलत होते. मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक आणि सरचिटणीस नितीन खानविलकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राज म्हणाले, की मुंबईत दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. उद्या ही वाहतूक व्यवस्था कोलमडली अन् सर्व रस्त्यावर गाड्या घेऊन आले तर बाहेर कसे पडणार? गाडी कुठे उभी करावी, यापासून सार्वजनिक वाहतुकीचा वापर कसा करावा, याबाबत आपल्याकडे कोणताही विचार किंवा शिस्त नाही,’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या मेळाव्याला मनसे नेते अविनाश जाधव, प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे, वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------------
‘शिस्तीसाठी इच्छाशक्ती हवी’

‘‘वाहतूक सिग्नल कोणी पाळत नाही. महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी येते, याची मी वाट पाहत आहे. सत्तेत आलो, तर राज्यात अशी शिस्त आणून दाखवेन. हे काही रॉकेट सायन्स नाही. त्यासाठी केवळ प्रबळ इच्छाशक्ती लागते,’’ असे राज यांनी सांगितले. शहर विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करताना तज्ज्ञांना विश्वासात घेण्याऐवजी तो केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी आणि जमिनी विकण्यासाठी तयार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
-----------------------
‘लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनातील फरक’

ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेला माणूस मंत्रिपदावर बसतो, तेव्हा त्याला मुंबई, नवी मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांचे गुंतागुंतीचे प्रश्न समजू शकत नाहीत. शहरात रस्ते, पाणी, वीज, शाळा आणि रुग्णालये दिसली की त्यांना सर्व काही आलबेल असल्याचे वाटते. त्यांच्या भागातील पाणी, रस्ते आणि भारनियमनाच्या तुलनेत शहरे त्यांना समृद्ध वाटतात. हा केवळ दृष्टिकोनातील फरक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com