

अथांग समुद्र, अमर्याद स्वप्नं
समुद्राच्या लाटा कधी शांत असतात, तर कधी त्यांचे रौद्र रूप पाहून मनात धडकी भरते. अशा अथांग समुद्रात तासन्तास पोहत राहण्यासाठी केवळ शारीरिक ताकद असून चालत नाही; त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, मानसिक कणखरपणा आणि स्वतःवरील अढळ विश्वास आवश्यक असतो. जेलीफिशच्या दंशासारख्या संकटांचा सामना केल्यानंतर अकरा शस्त्रक्रिया करूनही जलतरणाचे स्वप्न जिवंत ठेवणाऱ्या गीता महेश मालुसरे हिने आपल्या जिद्दीच्या बळावर जागतिक जलतरणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या ९६ दिवसांत इंग्लिश चॅनेल, कॅटालिना चॅनेल आणि मॅनहॅटन आयलंड स्विम ही तीन आव्हानात्मक जलतरण मोहिमा पूर्ण करण्याचा तिचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
- प्रियांका सत्यवान
गीता महेश मालुसरे ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आज महासागरांवर राज्य करत आहे. अवघ्या ९६ दिवसांत महासागरातील तीन खाड्या पार करत ‘ओपन वॉटर स्वीमिंग ट्रिपल क्राउन’ तिने पटकावला असून, जगातील सात प्रमुख खाड्या पोहून ‘क्वीन ऑफ ओशन’ हा बहुमान मिळविण्याचे तिने ध्येय ठेवले आहे. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या गीता हिचा जलतरणाचा प्रवास वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सुरू झाला. त्यानंतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत तिने सातत्याने प्रगती केली. तीनशेहून अधिक स्पर्धांमध्ये सहभागी होत तिने १००हून अधिक सुवर्णपदके, ७५हून अधिक रौप्यपदके आणि ७०हून अधिक ब्रॉंझपदके मिळवली आहेत.
तलावातील स्पर्धांमधील यशानंतर तिने खुल्या समुद्रातील जलतरणाचे आव्हान स्वीकारले. तलावात पाण्याची परिस्थिती तुलनेने नियंत्रित असते; मात्र, समुद्रात प्रत्येक क्षण अनिश्चिततेचा असतो. बदलते प्रवाह, उंच लाटा, पाण्याचे तापमान, हवामानातील चढ-उतार आणि शरीराचा वाढता थकवा अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत वेगाबरोबरच संयम, नियोजन आणि मानसिक स्थैर्य महत्त्वाचे ठरते. गीताने या आव्हानांचा स्वीकार करत आपल्या क्षमतेच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. गीताने सन २०१७ साली तिच्या १३व्या वाढदिवसाला मुंबईच्या समुद्रात ३२ किलोमीटर अंतर पोहून पूर्ण केले होते. दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्ष तिचा पोहण्याचा सराव पूर्ण बंद झाला होता. नंतर जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर तिने पुन्हा तिच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली. दोन महिन्यांच्या कसून सरावानंतर तिने पुन्हा मुंबईतील प्रॅांग्स लाईट हाऊस ते बेलापूर जेट्टी हे ३२ किलोमीटर अंतर अवघ्या साडेसहा सात पूर्ण केले. त्यातून तिने ‘क्वीन ऑफ ओशन’च्या उद्दिष्टपूर्ततेसाठी आपण सज्ज आहोत, हे दाखवून दिले आहे.
संकटांवर मात करत ध्येयाचा पाठलाग
कोरोनाच्या संकटानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये रत्नागिरी येथील सागरी स्पर्धेत पोहत असताना गीताला ‘जेलीफिश’ या विषारी जलचराचा तीव्र दंश झाला. तिचा हात निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता. तिच्या हातावर एका वर्षात तब्बल ११ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे गीताचे स्वीमिंग करिअर संपले असे वाटत होते. मात्र, गीताने हार मानली नाही! या जखमांवर मात करत तिने इतिहास रचला! दररोज आठ तास, तर कधी दहा तास तीने सराव केला. गीताच्या यशामागे केवळ सराव आणि शारीरिक क्षमता नाही, तर संकटांना सामोरे जाण्याची तयारीही महत्त्वाची आहे. अकरा शस्त्रक्रियांसारख्या शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागल्यानंतरही तिने जलतरणाची आवड कायम ठेवली. हातावरच्या खोल जखमा सुकलेल्या नसताना, हातातून रक्त येत असतानाही ती कधी थांबली नाही. संकटांमुळे ध्येयापासून दूर जाण्याऐवजी तिने पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग निवडला.
इंग्लिश खाडीत १४ तास ३१ मिनिटांची झुंज
इंग्लंड आणि फ्रान्स यांना विभक्त करणारी इंग्लिश खाडी पार करणे, हे खुल्या समुद्रातील जलतरणपटूंसाठी प्रतिष्ठेचे आव्हान मानले जाते. २७ जून २०२६ रोजी गीताने हे आव्हान पूर्ण केले. सुमारे ५४ किलोमीटरचे अंतर त्यांनी १४ तास ३१ मिनिटांत पार केले. समुद्रातील प्रवाह आणि लाटांमुळे जलतरणपटूला अपेक्षित मार्गापेक्षा अधिक अंतर पोहावे लागू शकते. दीर्घकाळ पाण्यात राहिल्याने शरीराची ऊर्जा कमी होते, थकवा वाढतो आणि मानसिक एकाग्रतेचीही कसोटी लागते. अशा परिस्थितीत ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवत प्रत्येक स्ट्रोकसोबत पुढे जाणे आवश्यक असते. इंग्लिश खाडी पार करत गीताने आपल्या आंतरराष्ट्रीय जलतरण प्रवासातील महत्त्वाचा टप्पा गाठला.
कॅटालिना खाडी आणि मॅनहॅटन आयलंडवरही यश
इंग्लिश चॅनेलनंतर गीतासमोर पुढील आव्हान होते, ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया परिसरातील कॅटालिना खाडीचे. १४ सप्टेंबर २०२६ रोजी तिने हे जलतरण १५ तास ४२ मिनिटांत पूर्ण केले. एका कठीण मोहिमेनंतर दुसऱ्या आव्हानासाठी स्वतःला तयार करणे, शारीरिक क्षमता टिकवणे आणि मानसिक तयारी कायम ठेवणे हीदेखील मोठी कसोटी होती. यानंतर १ ऑक्टोबर २०२६ रोजी गीताने न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन आयलंडभोवतीचे जलतरण पूर्ण केले. इंग्लिश खाडी, कॅटालिना खाडी आणि मॅनहॅटन आयलंड स्विम या तीन मोहिमांना एकत्रितपणे ओपन वॉटर स्वीमिंग ट्रिपल क्राऊन म्हणून ओळखले जाते. अवघ्या ९६ दिवसांत ही तीन आव्हाने पूर्ण केल्याने गीताच्या कामगिरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आपल्या यशामागील विचार मांडताना गीता म्हणते, ‘‘आयुष्यात कितीही अडचणी आल्या, तरी त्यांना न घाबरता धैर्याने सामोरे गेले पाहिजे. ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आपण जसा विचार करतो, तशी आपली कृती घडते आणि आपल्या विचारांचा आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खंबीर राहिले पाहिजे. ध्येय साध्य करण्यासाठी लागतील तेवढे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि ध्येयाच्या दिशेने सातत्याने पुढे जात राहा. कारण जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासच आपल्याला यशापर्यंत घेऊन जातात. ‘Always believe in yourself!’’’
लेकीच्या जिद्दीचा वडिलांना अभिमान
गीताच्या या कामगिरीचा तिचे वडील महेश मालुसरे यांनाही विशेष अभिमान वाटतो. भारताचा तिरंगा फडकावताना गीताचा फोटो पाहून मन भारावून जाते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ‘‘जिद्द, चिकाटी, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांनाही गवसणी घालता येते, हे गीताने सिद्ध केले. शारीरिक आव्हानांवर मात करत अवघ्या ९६ दिवसांत इंग्लिश चॅनेल, कॅटालिना चॅनेल आणि मॅनहॅटन आयलंड स्विम ही तीन आव्हाने पूर्ण करणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. जेलीफिशच्या दंशामुळे उद्भवलेल्या संकटातून सावरून तिने ज्या प्रकारे स्वतःला सिद्ध केले, त्याचा वडील म्हणून मला कायम अभिमान वाटतो,’’ असे महेश मालुसरे सांगतात. यापुढेही गीता सेव्हन ओशन चॅलेंजमधील उर्वरित आव्हाने यशस्वीरीत्या पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लेकीने प्रतिकूल परिस्थितीतून सावरत ध्येयाचा पाठलाग सुरू ठेवल्याचे समाधान त्यांच्या शब्दांतून व्यक्त होते.
प्रेरणेचा दीप
गीता महेश मालुसरे हिचा प्रवास हा केवळ जलतरणातील कामगिरीचा वृत्तांत नाही; तो स्वतःच्या मर्यादांना आव्हान देण्याच्या वृत्तीचा परिचय आहे. शारीरिक अडचणींवर मात करून, जागतिक स्तरावरील आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी करून आणि प्रत्येक टप्प्यानंतर पुढचं ध्येय निश्चित करून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समुद्राच्या लाटा कधी अनुकूल असतात, तर कधी प्रतिकूल. पण प्रत्येक लाटेला सामोरं जाण्यासाठी जलतरणपटूला पुन्हा हात पुढे टाकावा लागतो. आयुष्याचंही तसंच आहे. संकटं थांबण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा, त्यांचा सामना करण्याची तयारी ठेवणं महत्त्वाचं असतं. गीता मालुसरे हिची जिद्द हाच संदेश देते. स्वप्नं मोठी असतील, तर त्यासाठीची तयारीही मोठी असली पाहिजे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी चिकाटी, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर माणूस आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. अथांग समुद्राला गवसणी घालण्याचा तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणेचा दीप ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.