

पुणे, ता. ८ : ‘आज सोशल बॅटरी लो आहे’, ‘खूप ओव्हरथिंकिंग होतंय’, ‘मला थोडी स्पेस हवी आहे’... घराघरांतल्या ‘जेन झी’ मुलांकडून अशी वाक्ये, असे शब्दप्रयोग हल्ली अनेकदा ऐकायला मिळत आहेत. मात्र या शब्दांमागे केवळ ‘स्लॅंग’ नाही, तर मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोनही दडला आहे.
‘अँझायटी’ (Anxiety), बर्नआऊट, सोशल बॅटरी, ओव्हरथिंकिंग, ‘मी टाइम’ (Me Time), डिजिटल डिटॉक्स हे शब्द आता ‘जेन झी’च्या शब्दकोशात सहज मिसळले आहेत. पूर्वी ‘मूड नाही’, ‘थकलो आहे’ किंवा ‘आज कुणाला भेटायची इच्छा नाही’ एवढ्यावर थांबणाऱ्या भावना आता ही पिढी अधिक नेमक्या शब्दांत व्यक्त करते. जेन झी पिढी मानसिक आरोग्याबाबत पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा अधिक मोकळेपणाने बोलताना दिसते.
मानसिक आरोग्याची समस्या गंभीर झाल्यावरच तज्ज्ञांची मदत घ्यायची, या पारंपरिक समजुतीऐवजी स्वतःला समजून घेण्यासाठी, भावनिक गोंधळ मांडण्यासाठी किंवा एखाद्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीही मदत घेता येते, असा दृष्टिकोन या पिढीतील मुलांमध्ये वाढतो आहे. याच बदलाचा एक भाग म्हणजे ‘थेरपी’ आणि समुपदेशनाकडे पाहण्याची दृष्टीही बदलते आहे. मानसिक आरोग्याभोवती असलेला ‘टॅब्यू’ हळूहळू दूर होताना दिसतो आहे.
मात्र, सोशल मीडिया आणि स्लॅंगमुळे मानसिक आरोग्याशी संबंधित काही शब्दांचा सरसकट वापरही वाढला आहे. साधा ‘मूड ऑफ’ असतानाही ‘डिप्रेशन’ किंवा प्रत्येक अस्वस्थतेला ‘अँझायटी’ म्हणण्याचा प्रकारही दिसतो आहे. त्यामुळे शब्दांचा अर्थ समजून आणि त्यांचा योग्य संदर्भात वापर करण्याची गरजही मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते.
मानसिक आरोग्याकडे खुलेपणाने पाहा
‘‘मानसिक आरोग्याशी संबंधित संज्ञा आणि शब्द ‘जेन झी’च्या सहज वापरात येण्यामागे इंटरनेटचा वाढता संपर्क हे महत्त्वाचे कारण आहे. स्वतःच्या भावनांविषयी त्यांच्यात जागरूकता वाढली आहे. मानसिक आरोग्याबाबतचा संकोच कमी झाला असून ही पिढी शारीरिक आजारांप्रमाणेच मानसिक आरोग्याच्या समस्यांचाही सहजपणे स्वीकार करत आहे. या वाढत्या जागरूकतेला योग्य दिशा देण्यासाठी त्यांच्या पालकांनी ‘जेन झी’च्या भावना मोकळेपणाने ऐकून घेणे आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विषयांकडे त्यांच्याइतकेच खुलेपणाने पाहणे गरजेचे आहे’’, असे मत बाल मानसोपचारतज्ज्ञ मुक्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
आम्ही मित्रांमध्ये अँझायटी, स्ट्रेस किंवा बर्नआऊट याबद्दल सहजपणे बोलतो. कारण मनात ठेवण्यापेक्षा आपल्याला काय होतं आहे, हे बोलून दाखवलं तर समोरच्यालाही समजतं आणि मदत घेणं सोपं होतं, असा अनुभव आहे.
- अनिकेत पाटील
सोशल बॅटरी किंवा ‘मी टाइम’ हे शब्द आम्ही रोजच्या भाषेत वापरतो. याचा अर्थ प्रत्येक वेळी मोठी समस्या आहे, असं नाही. पण आपल्याला काय वाटतं आहे आणि त्याला काय म्हणतात, हे समजणं महत्त्वाचं आहे.
- सई गडकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.