...म्हणून 'ती' घरातून पळून आली होती पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

पुणे : 'ती' मध्यमवर्गीय कुटुंबातील. पण दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे सध्या घरीच होती. घरात एकटीला कंटाळा येतो म्हणून तिने मोबाईलशी संगत केली. त्यातून फेसबुकद्वारे तिला काही मित्र-मंडळी मिळाली. पण सतत मोबाईल बाळगण्यामुळे आई-वडील तिच्यावर रागावले. आपले आई-वडील आपल्याला स्वातंत्र्यच देत नाहीत, म्हणून 'ती' मुंबईहून पुण्याला मित्रांच्या भेटीसाठी आली. पण, भेदरलेल्या अवस्थेतील ''ती' चाणाक्ष पोलिसांच्या निदर्शनास आली आणि ती आई-वडिलांकडे सुखरूप पोचली ! 

16 वर्षांची प्रियांका (नाव बदलले आहे) एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. मुंबईतील जेरीमेरी परिसरात आपल्या आई-वडिलांसमवेत छोट्या कुटुंबात राहते. पण दहावीच्या परीक्षेत एका विषयामध्ये ती अनुउत्तीण झाली. त्यानंतरही आई-वडिलांनी तिला समजून घेत तिला शिकण्यासाठी उभारी दिली, तशीच काही बंधनेही घातली. आई-वडील दोघेही नोकरीला असल्यामुळे प्रियांका घरी एकटीच असे. त्यामुळे कंटाळा येत असल्याने ती सातत्याने मोबाईलमध्ये व्यस्त राहू लागली. त्यातून फेसबुकद्वारे औरंगाबादमधील काही तरुणांशी तिची मैत्री झाली. 

दरम्यान, रविवारी आई-वडील घरी असताना मोबाईलचा वापर करण्यावरून त्यांचा प्रियांकाशी वाद झाला. आई-वडील कायम आपल्याला त्रास देतात, असे वाटू लागल्याने तिने फेसबुकवरील मित्राशी संपर्क साधला. 'मला स्वातंत्र्य पाहिजे आहे. मी पुण्याला येत असून तुम्ही मला भेटायला या' असा मेसेज त्यांना पाठवून तिने सोमवारी सकाळी साडे सात वाजता रागाच्या भरात घर सोडले. 

खासगी बसने ती दुपारी शिवाजीनगर परिसरात उतरली. त्यानंतर तेथेच मित्र-मैत्रिणींची वाट पाहत बसली. तेवढ्यात रस्त्याच्याकडेला बसलेली प्रियांका शिवाजीनगर पोलिस चौकीतील महिला पोलिस कर्मचारी सारिका कुंभार यांच्या निदर्शनास आली. त्यांना संशय आल्याने त्यांनी तिला विश्‍वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. त्यानंतर तिने आपण घरातून पळून आलो असून इथे मित्र भेटणार असल्याचे सांगितले. 

दरम्यान, कुंभार यांनी प्रियांकाला शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्याकडे नेले. त्यांनीही तिच्याशी संवाद साधला. त्यानंतर तिचे आई-वडील, मामा यांना मुंबईहून बोलावून घेतले. मुलीसह त्यांचेही समुपदेशन केले आणि मुलीला त्यांच्याकडे सुपूर्द केले. पोलिसांनी केलेल्या या मदतीमुळे तिच्या पालकांनी पोलिसांचे कौतुक करीत आभार मानले 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl ran away from home found at pune