युवतीच्या नजेरने झाला तो अक्षरशः घायाळ...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

युवकाकडे अनोळखी तरुणी एकटक पाहते... तिच्या सततच्या पाहण्याला तरुण डोळ्यानेच मूकसंमती देतो आणि मोबाईल नंबर लिहून कागद रस्त्यावर टाकतो...

लोणी काळभोर (पुणे): युवकाकडे अनोळखी तरुणी एकटक पाहते... तिच्या सततच्या पाहण्याला तरुण डोळ्यानेच मूकसंमती देतो आणि मोबाईल नंबर लिहून कागद रस्त्यावर टाकतो... थोड्याच वेळात त्या नंबरवर तरुणीचा फोन येतो आणि ती भेटण्याची इच्छा व्यक्त करते... काही वेळातच दोघे गप्पा मारण्यासाठी एकांतात भेटतात... मात्र, तेथे तीन तरुण येऊन त्याच्यावर कोयत्याने वार करतात आणि त्यात तो गंभीर जखमी होतो... अशी सिनेमाची वाटणारी कथा प्रत्यक्षात थेऊर (ता. हवेली) येथे घडली.

रोहित सुरेश उदावंत (वय 35, रा. सध्या आंबेगाव पठार, धनकवडी, पुणे, मूळगाव शिरूर) हे या प्रकारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो धनकवडी परिसरात आपल्या आईसह राहण्यास आहे. तो वॉटर फिल्टरची विक्री व दुरुस्तीची कामे करतो. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तो कामानिमित्त हडपसर परिसरात गेला होता, त्या वेळी घडलेली ही घटना. एक तरुणी त्याच्याकडे एकटक पाहत असल्याचे त्याच्या लक्षात येते. सुरवातीला तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, तरुणी नजर हटवत नसल्याचे त्याच्या लक्षात येते, त्यामुळे तो तिच्याशी नजरेनेच बोलण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःचा मोबाईल नंबर लिहून कागद रस्त्यावर टाकून निघून जातो. थोड्याच वेळात त्याच्या मोबाईलवर संबंधित मुलगी फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त करते. त्याला तो लागलीच होकार देतो. त्यानंतर दोघेही हडपसरहून पुणे- सोलापूर महामार्गावर थेऊर फाट्यावर येतात. त्या वेळी संबंधित मुलगी गाढवे मळा परिसरातील पुलाखाली गप्पा मारण्यासाठी मोटारसायकल थांबवण्यास सांगते. दोघेही मोटारसायकल पुलाखाली घेऊन एकमेकांची विचारपूस सुरू करतात. मात्र, त्याचवेळी दोन मोटारसायकलवरून तीन तरुण तेथे येऊन थांबतात. त्यामुळे रोहित मोटारसायकलवरून थेऊर गावाकडे जाण्यासाठी निघतो. मात्र, ते तीन तरुण त्यांना थांबण्यास भाग पाडतात आणि रोहितवर हल्ला करतात. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी धाव घेतल्याने मारहाण करणारे तीनही तरुण आपापल्या मोटारसायकलवरून पळून गेले. जखमी रोहित याला काही नागरिकांनी कदमवाकवस्ती हद्दीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

रोहित याच्यावर झालेला हल्ला व त्याच्यासोबत असणाऱ्या तरुणीची सखोल माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. हल्ला करणाऱ्या तीनपैकी दोघांची व रोहित बरोबर फिरायला आलेल्या तरुणीची ओळख पटली असून, एका हल्लेखोराची ओळख पटवणे बाकी आहे. तीनही हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. केवळ एकटक पाहते म्हणून अनोळखी तरुणीबरोबर फिरायला जाणे ही बाब धोकायदाक आहे. या घटनेतून सर्वांनीच धडा घेण्याची गरज आहे.
- सूरज बंडगर, पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर (ता. हवेली)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl was attacked by a boy for staring at him