धक्कादायक! पोटच्या मुलींनीच केलं आईला बेघर 

जनार्दन दांडगे
Monday, 21 September 2020

  • कुंजीरवाडी येथील घटना; लोणी काळभोर पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा 

लोणी काळभोर (पुणे) : मुलींवर प्रत्येक आई-वडिलांचा विश्वास, प्रेम व अभिमानही... मात्र या मुलीबद्दलचा विश्वासाला तडा घालणारी घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे घडली आहे. येथील एका 65 वर्षीय आईचा, पोटच्या दोन मुलींनी शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर काढल्याची घटना उघडकीस आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विमल दत्तू पाटोळे असे त्या ज्येष्ठ महिलेचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी थोरली मुलगी राधा किरण जाधव, धाकटी मुलगी सविता उदय माने व सविताचा नवरा उदय कुमार माने या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल पाटोळे यांना राधा व सविता अशा दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. विमल यांच्या पतीचे 20 वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. विमल यांचा मुलगा गणेश हा त्याच्या कुटुंबासह कुंजीरवाडी गावातच आईपासून वेगळा राहत आहे. तर विमल या लग्न झालेल्या दोन मुलीसह स्वतःच्या घरात राहतात. धाकटी मुलगी, सविताचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाल्याने, ती व नवरा विमल पाटोळे यांच्या घरात राहत होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, मागील दहा दिवसांपासून घरात राहण्यावरून विमल व दोन मुलीत भांडणे सुरू झाली होती. घरात जागा पुरत नसल्याचे कारण पुढे करत, विमल पाटोळे यांच्या दोन्ही मुलींनी विमल यांना घर सोडण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली होती व अखेर आई विमल यांना घराबाहेर काढले. 

आईने विनवणी करूनही... 

विमल पाटोळे यांनी घराबाहेर पडण्यास नकार देताच, 14 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दोन्ही मुलींनी व सविताचा पती उदय या तिघांनी विमल यांना घराबाहेर हाकलून दिले. त्याचवेळी विमल यांची कपडे व घरोपयोगी भांडीही घराबाहेर फेकून दिली. यावेळी विमल पोटोळे यांनी विनवणी करूनही, दोन्ही मुलींनी विमल यांना घरात घेण्यास नकार दिल्याने, अखेर विमल पाटोळे यांनी लोणी काळभोर पोलिसात धाव घेतली व दोन मुली व एका जावयाच्या विरोधात तक्रार दाखल केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girls expel mother out of the house in kunjirwadi havel pune