‘शास्त्रीय संगीतासह नाट्यसंगीतालाही द्या महत्त्व’ - पं. मुकुंद मराठे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Give importance to classical music as well as theatrical music p Mukund Marathas pune

‘शास्त्रीय संगीतासह नाट्यसंगीतालाही द्या महत्त्व’ - पं. मुकुंद मराठे

पुणे : ‘नाट्यसंगीत हा शास्त्रीय गायनाचाच भाग आहे. नाट्यसंगीत हे भावसंगीत असले, तरी त्यात शास्त्रीय संगीतातील उपज, उत्स्फूर्तता आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीतासह नाट्यसंगीतालाही महत्त्व द्या. त्यासाठी रसिकांनीही प्रत्येक मैफिलीत गायकांना नाट्यगीत गाण्याचा आग्रह करायला हवा’, अशी अपेक्षा ज्येष्ठ गायक पं. मुकुंद मराठे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. तसेच, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’चे फ्युजन सादर करणारे कलाकार मुलांचे आदर्श होऊ लागले आहेत. त्यामुळे आज मुलांच्या पालकांनी त्यांचे आदर्श तपासून पाहण्याची गरज आहे, असे परखड मतही पं. मराठे यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे बालगंधर्वांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा ‘बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार’ पं. मराठे यांना डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कर-सल्लगार विजयकांत कुलकर्णी, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. अभ्यंकर म्हणाले, ‘‘बालगंधर्वांची गायकी म्हणजे नाट्यसृष्टीतील चिरकाल आणि शाश्वत असे सुवर्णपान आहे. बालगंधर्वांची गायकी कोणत्याही अंगाने पाहिली, तरी सहज आणि सुंदर दिसायची. प्रारंभी बालगंधर्वांना नाटकात काम करायचेच नव्हते. पंरतु, देवल यांनी त्यांना समजावल्यानंतर ते राजी झाले आणि त्यांनी इतिहास घडविला.’’

यावेळी ‘रंगगंधर्व’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, सुहास वाळुंजकर यांना आण्णासाहेब किर्लोस्कर, डॉ. शशिकला शिरगोपीकर यांना भास्करबुवा बखले, विश्वास पांगारकर यांना गो. ब. देवल, अभिषेक काळे यांना काकासाहेब खाडिलकर, अभिजित जायदे यांना डॉ. सावळो केणी, बाळ दाते याना खाऊवाले पाटणकर, रवींद्र अग्निहो‌त्री याना रंगसेवा पुरस्कार, प्राजक्ता काकतकर व गायत्री कुलकर्णी यांना लक्ष्मीबाई पंडित आणि प्रमोद जोशी व आर. आर. कुलकर्णी यांना द. कृ. लेले पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रंगबहार या नाट्यसंगीताच्या मैफल संपन्न झाली.

Web Title: Give Importance To Classical Music As Well As Theatrical Music P Mukund Marathas Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top