गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव

गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव
Published on: 

‘गोकुळ’ ‘अमूल’च्या
घशात घालण्याचा डाव

सतेज पाटील यांचा आरोप; सोमवारी कोल्हापुरात महामोर्चा

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई ः कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी समविचारी आघाडीला कौल दिलेला असताना तो नाकारण्याचे पाप महायुती सरकार करत आहे. राज्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला हा संघ ‘अमूल’च्या घशात घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. याविरोधात सोमवारी (ता. ९) कोल्हापुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे. यापुढे गोकुळ वाचविण्यासाठी रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाईसाठी सज्ज आहे, असा इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी (ता. ५) गांधी भवन येथील पत्रकार परिषदेत दिला.
गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा समविचारी आघाडीकडे असतानाही महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी शासन नियुक्त चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी कायद्यात सुधारणा आणि अधिनियम दुरुस्ती करण्यास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. त्यामुळे महायुतीचा गोकुळमधील सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी महायुती सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले.
ते म्हणाले, की गोकुळ सर्वसामान्य शेतकऱ्यांचा दूध संघ आहे. आगामी काळात गोकुळच्या पदार्थांवर ‘अमूल’चे लेबल लावून गोकुळ घशात घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने गोकुळची सत्ता काबीज करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा घाट घातला आहे. यातून साखर कारखाने व जिल्हा बँकांना वगळण्यात आले आहे, फक्त गोकुळमधील सत्ता मिळविण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. हा कायदा गोकुळ पुरता मर्यादित राहणार असून, उद्या तो कोणत्याही संस्थेसाठी लागू केला जाऊ शकतो. मुंबईत एसआरए प्रकल्पांनाही असेच नियम केले जातील. भाजप सरकार सहकार क्षेत्रात चुकीचा पायंडा पाडत आहे. हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाणार आहे. निवडणूक झाल्यानंतर कायदा आणून तो पूर्वलक्षी प्रभावाने कसा काय लागू होतो. कोल्हापूरकांनी जो कौल दिला तो नाकारण्याचे काम सरकार करत आहे. सरकारने घेतलेला निर्णय कोल्हापूरकर कदापि मान्य करणार नाहीत. याविरोधात रस्त्यावरची लढाईबरोबर न्यायालयातही लढू.

दुरुस्तीमागे हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील
आमदार पाटील म्हणाले, की गोकुळवर ५.५ लाख शेतकऱ्यांचा संसार चालतो. शेतकऱ्यांना दूधदरापोटी दर १० दिवसाला १०० कोटी रुपये बिलापोटी दिले जातात. दररोज २० लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. गोकुळ शेतकऱ्याच्या मालकीचा आहे आणि भाजप सरकार शेतकऱ्यांचा कौल डावलत आहे. हा कायदा करण्यामागे मंत्री हसन मुश्रीफ व चंद्रकांत पाटील यांचा सहभाग आहे, असेही सतेज पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.