विधान परिषद निवडणूक

विधान परिषद निवडणूक
Published on: 

फोटो : विधान मंडळ

‘गोकुळ’ फॅक्टर तोडण्याचे भाजपपुढे तगडे आव्हान
शिक्षक, पदवीधर निवडणूक : ॲक्टिव्ह शिवसेना अन्‌ सायलेंट राष्ट्रवादीची डोकेदुखी

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : अवघ्या चारच दिवसांवर विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे मतदान आले आहे. या मतदानापूर्वी काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ने जोरदार मुसंडी मारली आहे. ‘गोकुळ’च्या निकालातून पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजपविरोधकांना मोठा आत्मविश्‍वास मिळाला आहे. शिक्षक, पदवीधरच्या मतदानापूर्वी (शुक्रवार, ता. २३) त्यांच्या या आत्मविश्‍वासाला तोडण्याचे मोठे आव्हान भाजप नेत्यांसमोर उभे राहिले आहे.
‘गोकुळ’च्या निकालाचा परिणाम पदवीधर व शिक्षकच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. पुणे शिक्षकची जागा काँग्रेसकडून आमदार जयंत आसगावकर व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षदा जाधव-देशमुख लढत आहेत. काँग्रेसचे आसगावकर हे कोल्हापूरचे आहेत, तर भाजपने या निवडणुकीत शिक्षकसाठी मैदानात उतरविलेले कौस्तुभ गावडे व पदवीधरसाठी मैदानात उतरविलेल्या डॉ. स्मिता जाधव हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे ‘गोकुळ’च्या निकालाचा थेट परिणाम तीन उमेदवारांवर कोल्हापूर जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. शेजारच्या सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतही भाजपविरोधी नेत्यांना या निकालाने आत्मविश्‍वास मिळण्याची शक्यता आहे.
आसगावकर व जाधव यांच्या प्रचारासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ज्या प्रमाणे एकोपा दिसतो, त्या प्रमाणे महायुती म्हणून एकोपा दिसत नाही. शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पुरस्कृत करून शेवटच्या टप्प्यात भाजपविरोधात भूमिका घेतली आहे. शिक्षकसाठी विरोध करणारे शिवसैनिक पदवीधरसाठी कोणाचे काम करत आहेत, याचाही शोध घेण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांचे नेते व कार्यकर्ते या निवडणुकीत सध्या तरी शांत दिसत आहेत. कामापेक्षा जास्त ॲक्टिव्ह झालेली शिवसेना आणि अजूनही सायलेंट असलेली राष्ट्रवादी भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

आता परीक्षा दुसऱ्या ‘चक्रव्यूहा’ची
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे मंत्री प्रकाश आबिटकर, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीतून टाकलेले चक्रव्यूह काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी यशस्वीपणे भेदले आहे. आमदार सतेज पाटील यांची भाची असलेल्या डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी देऊन भाजपने विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत आमदार पाटील यांच्याभोवती नात्याचे चक्रव्यूह टाकले आहे. दुसरे चक्रव्यूह आमदार पाटील कसे भेदणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या टप्प्यात त्यांनी नात्याला प्राधान्य दिल्यास ‘रयत’ची ताकद काँग्रेसच्या आसगावकरांऐवजी रासपच्या दत्तात्रय सावंतांच्या पाठीशी उभी राहण्याची शक्यता आहे.

भाजपचे नवे अन्‌ जुने लागले कामाला
पुणे शिक्षकची जागा भाजप पहिल्यांदाच लढत आहे. पदवीधर आणि शिक्षकची लढत भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी भाजपने नव्या आणि जुन्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना शिस्तीत कामाला लावले आहे. संघटनात्मक ताकद आणि जिंकण्यासाठी लागणारे सर्व काही देण्याची असलेली तयारी ही भाजपची जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री फडणवीस निवडणुकीतील कामगिरी पक्की लक्षात ठेवत असल्याने भाजपची नवी-जुनी यंत्रणा अलर्ट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com