चोरीचा गुन्हा आठ तासांत उघड; दोन लाख ६९ हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त
चोरीप्रकरणी संशयित आठ तासांत जेरबंद
रहिमतपूर पोलिसांची कारवाई; दोन लाख ६९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
रहिमतपूर, ता. २२ : कोरेगाव मार्गावर झालेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा उलगडा रहिमतपूर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत करून संशयिताला जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे दोन लाख ६९ हजार १३२ रुपयांची १६.९ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे. राहुल सर्जेराव कदम (रा. साप, ता. कोरेगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अजय विठ्ठल गाडे (वय ३७, रा. वडूज रोड, रहिमतपूर) हे २१ फेब्रुवारीला दुचाकीवरून रहिमतपूरहून कोरेगावकडे जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. कोरेगाव येथे काम आटोपल्यानंतर तोच व्यक्ती रहिमतपूरला परत येण्यासाठी सोबत आला. दरम्यान, दुघी (ता. कोरेगाव) येथील पुलाजवळ निर्जन ठिकाणी लघुशंकेचा बहाणा करून दुचाकी थांबवून अज्ञात व्यक्तीने फिर्यादी अजय गाडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील १६.९ ग्रॅम वजनाची सुमारे दोन लाख ६९ हजार १३२ रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला.
या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रहिमतपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे यांनी दोन विशेष पथके स्थापन केली.
तपासादरम्यान पोलिस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढला. संशयिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चेन जप्त करण्यात आली.
कारवाईत पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, हेड कॉन्स्टेबल सचिन माने, प्रवीण बर्गे, पोलिस नाईक सुशांत शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल महेश देशमुख, दीपक देशमुख व तुषार काळंगे यांनी सहभाग घेतला. तपास पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे करीत आहेत.
--------------------------
01631
रहिमतपूर : ताब्यात घेतलेल्या संशयितासमवेत पोलिस अधिकारी, कर्मचारी.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

