
Gold Rate : सोन्याला आला आजरवरचा सर्वाधिक भाव
पुणे : डॉलर कुमकुवत झाल्यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बॅंकांनी सोने खरेदी सुरू केल्यामुळे सोन्याचे भाव वाढू लागले आहेत. मुंबईतील बाजारपेठेत सोन्याचा भाव ५६ हजार ४०० रुपये प्रती १० ग्रॅमला तर, २४ कॅरेट सोन्याचा भाव ५६ हजार ६०० रुपये होता.
किरकोळ बाजारपेठेत हा भाव अनुक्रमे ५७ हजार ५०० आणि ५७ हजार ७०० रुपये होता. भारतीय बाजारपेठेत सोन्याचा आजचा भाव हा आजवरचा सर्वाधिक आहे.
चीन, जपान, रशियाकडून गेल्या दीड महिन्यांपासून सोने खरेदी सुरू आहे. डॉलर कुमकुवत होत असल्याने त्यांनी खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बॅंकांनीही खरेदी सुरू केली आहे. परिणामी सोन्याचे भाव वाढू लागले आहेत.
तसेच चीन, रशिया डॉलर विकून सोने खरेदी करीत आहेत. त्याचे पडसाद भारतीय बाजारपेठेतही उमटले असून येथील सोन्याचा भाव वाढत आहेत. जागतिक बाजारपेठेत २०२१मध्ये कोरोना महासाथी दरम्यान सोन्याचा भाव प्रती औंस २०७० (३१.११ ग्रॅम) डॉलर झाला होता.
भारतीय रूपयांत तो भाव प्रती दहा ग्रॅमला ६१ हजार १२४ रुपये झाला होता. रशिया - युक्रेन युद्ध सुरू झाले तेव्हीही जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ६१ हजार रुपयांपर्यंत गेला होता.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया गेल्या ६ महिन्यांत ४ ते ५ टक्क्यांनी कुमकुवत झाला आहे. त्यामुळेही ग्राहकांकडून सोने खरेदी वाढू लागली आहे, अशी माहिती पु. ना. गाडगीळ ॲन्ड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी दिली.