esakal | खूशखबर! शेतकऱ्यांना मिळणार तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

खूशखबर! शेतकऱ्यांना मिळणार तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

sakal_logo
By
अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज (interest free loan) मिळणार आहे. एक ते तीन लाखांच्या कर्ज मर्यादेत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास ही सवलत देण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. (Good news Farmers will get interest free loan up to Rs 3 lakh)

हेही वाचा: LPG गॅससाठी आता डिस्ट्रिब्युटर निवडता येणार; जाणून घ्या कसं?

मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे राज्य सरकारची व्याज दर सवलत तीन टक्के आणि केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.

व्याज दरात आणखी दोन टक्के सवलत मिळणार

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. या योजनेत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३ टक्के व्याज सवलत देण्यात येत होती. एक लाख ते तीन लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत व्याज दरात एक टक्का सवलत देण्यात येत होती. आता एक ते तीन लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास त्यांना व्याज दरात आणखी दोन टक्के सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

शेती उत्पादन वाढ होईल

या निर्णयामुळे कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.