
पुणे : सर्व प्रकारच्या लोकल, इंटरसिटी ट्रेन आणि रेल्वे गाड्यांसाठी त्रैमासिक, मासिक, सहा महिन्यांचा आणि एक वर्षांचा पास प्रवाशांना देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी रात्री परवानगी दिली आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.मुंबईत सर्व प्रकारच्या उपनगरी लोकलसाठी तसेच पुणे - मुंबई मार्गावर, पुणे- दौंड, मुंबई- इगतपुरी, नाशिक- मनमाड, नाशिक- भुसावळ, भुसावळ- मनमाड, कोल्हापूर- मिरज रेल्वेद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक पास गरजेचा होता. रोज रांगेत उभे राहून तिकीट काढून प्रवास करणे त्यांना जिकिरीचे झाले होते या पार्श्वभूमीवर पासमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार मध्य रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना फक्त लोकलचा प्रवास खुला केला होता. प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ज्या प्रवाशांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, त्यांना युनिव्हर्सल पास देण्यास सुरुवात केली होती. या पासच्या आधारे प्रवासी एक महिन्यांसाठी प्रवास करू शकत होते. परंतु अनेक दिवसांपासून त्यांना मासिक, त्रैमासिक, सहा महिन्यांचा आणि एक वर्षांचा पास मिळत नव्हता. त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली होती. मासिक पास दिल्यास प्रवाशांची संख्या वाढेल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे होते. परंतु रेल्वे प्रवासी संघटनांनी ही मागणी लावून धरल्यामुळे राज्य सरकारने एक विशेष आदेश काढून 26 ऑक्टोबर रोजी मासिक, त्रैमासिक, सहा महिन्यांचा आणि एक वर्षांचा पास प्रवाशांना वितरीत करण्यास हरकत नसल्याचे रेल्वे प्रशासनाला कळविले आहे.
पुण्यातील रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी प्रवाशांना पास मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यासाठी मध्य रेल्वेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही त्यांनी निवेदने सादर केली होती. तसेच मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडे ही त्यांनी पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पास उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच देशातील इतर रेल्वे विभागानुसार मध्य रेल्वेनेही प्रवाशांना प्रवासासाठी जनरल तिकीट देण्यास सुरुवात करावी, अशी मागणीही त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. पुणे, शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, तळेगाव, लोणावळा येथून मुंबईला रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. प्रवासाचा पास उपलब्ध झाल्यामुळे त्यांना आता आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.