

पान १
उपग्रहाद्वारे शेतीतील
बदलांवर ‘डीपमाइंड’ची नजर
गुगलची दोन एआय मॉडेल्स; भारतासह ११ देशांमध्ये वापर आणि चाचणी
नवी दिल्ली ः गुगल डीपमाइंडची दोन एआय मॉडेल्स आता भारतासह इतर देशांमध्ये वापरली जात आहेत. या मॉडेल्सच्या मदतीने उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून शेतजमिनींच्या हद्दी, पिकांची स्थिती आणि शेतीतील बदलांची माहिती मिळवता येणार आहे.
गुगल डीपमाइंडने ही मॉडेल्स सुरुवातीला भारतातील कृषी क्षेत्रासाठी विकसित केली होती. आता त्यांची चाचणी आशिया-पॅसिफिक आणि आफ्रिकेतील ११ देशांमध्ये केली जात आहे. या मॉडेल्समधून मिळणारी माहिती एपीआय आणि गुगल अर्थवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भारतात टेरास्टॅकने १४ कोटी हेक्टरपेक्षा अधिक शेती क्षेत्राचे मॅपिंग केले आहे. या माहितीचा वापर शेतकऱ्यांना कर्ज देताना केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक शेताची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्याची गरज कमी झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
तेलंगणात वापर
तेलंगणातही या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील ५० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी स्थानिक पातळीवर पीक सल्ला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिकावर ताण आला आहे का, हवामानाचा पिकावर काय परिणाम होऊ शकतो आणि कोणत्या भागात किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे, याची माहिती या तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
कर्नाटकचाही पुढाकार
कर्नाटकच्या जलसंपदा विभागानेही एएलयू आणि एएमईडी मॉडेल्सचा वापर सुरू केला आहे. कर्नाटकमधील २६ लाख हेक्टर सिंचन क्षेत्रातील पिकांची स्थिती आणि पाण्याची गरज समजून घेण्यासाठी उपग्रह, हवामान आणि इतर माहितीचा वापर केला जात आहे. यामुळे कोणत्या भागात पाण्याची अधिक गरज आहे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर कसा करता येईल, याबाबत निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
भातशेतीतही प्रयोग
कार्बनफार्मने एएलयू आणि जेमिनीच्या मदतीने शेतांच्या हद्दी ओळखण्याचे काम सुरू केले आहे. भातशेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना तत्काळ माहिती देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. कंपनीने २०३० पर्यंत २० लाख हेक्टर क्षेत्रावर कमी-कार्बन भातशेती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
‘एफएओ’च्या प्रणालीत समाविष्ट
गुगल डीपमाइंडची ही दोन्ही एआय मॉडेल्स संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) जागतिक कृषी माहिती प्रणालीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. या माहितीचा वापर कृषी नियोजन, पीक निरीक्षण, शाश्वत शेती आणि अन्नसुरक्षेसाठी केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.