

TVS26A00137
गोपाळपूर (ता. पंढरपूर) : येथील विष्णुपद मंदिराच्या दगडी बांधकामावर चिखलापासून तयार झालेली पक्ष्यांची घरटी.
---
दगडी भिंतीवर चिखलाची ‘पक्षीनगरी’!
विष्णुपद मंदिरात शेकडो घरटी; चंद्रभागेच्या पाण्यामुळे पक्ष्यांना सुरक्षित आसरा
पांडुरंग सूर्यवंशी : सकाळ वृत्तसेवा
तावशी, ता. १५ : पक्षी म्हटले की झाडांच्या फांद्यांवर गवत, काड्या, पाने व पालापाचोळ्यापासून तयार केलेली घरटी डोळ्यांसमोर येतात. मात्र, निसर्गातील प्रत्येक पक्ष्याची घरटे बांधण्याची पद्धत वेगळी असते. याचा अनोखा प्रत्यय गोपाळपूर येथील चंद्रभागा नदीपात्रातील प्राचीन विष्णुपद मंदिरात येत आहे. मंदिराच्या दगडी बांधकामावर शेकडो लहान-मोठ्या चिखलाच्या घरट्यांची वसाहत निर्माण झाली असून, ही ‘पक्षीनगरी’ पक्षीप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.
ही घरटी भांडीक किंवा भिंगरी समूहातील चिखलघरटी करणाऱ्या पक्ष्यांची आहेत. हे पक्षी पाणथळ भागातून चिखलाचे छोटे गोळे चोचीत आणून त्यांची एकावर एक रचना करतात. लाळेच्या चिकटपणामुळे हे गोळे घट्ट चिकटतात आणि त्यातून घरट्यांची निर्मिती होते. दगडी वास्तू, पुलांच्या कमानी, विहिरींच्या भिंती किंवा पाण्याजवळील संरक्षित ठिकाणी अशा घरट्यांच्या वसाहती आढळतात. गोपाळपूरचे विष्णुपद मंदिर या पक्ष्यांसाठी अनुकूल ठरत असल्याचे दिसते. चंद्रभागा नदीपात्रातील या दगडी मंदिराभोवती पाण्याचे नैसर्गिक वातावरण असल्याने घरट्यासाठी आवश्यक चिखल आणि सुरक्षित आसरा दोन्ही सहज उपलब्ध होतात.
---
एका ठिकाणी चिखल, दुसरीकडे गवत-काड्या
गोपाळपूर परिसरातील विहिरींच्या कडेला किंवा पाणवठ्याजवळील झाडांवर काही पक्षी गवताच्या काड्या, बारीक मुळे, पाने व पालापाचोळ्याचा वापर करून घरटी तयार करतात. सुगरण पक्षी तर गवताचे तंतू व काड्या विणून अत्यंत कौशल्यपूर्ण लोंबते घरटे तयार करतो. त्याउलट विष्णुपद मंदिराच्या दगडी बांधकामावर दिसणाऱ्या घरट्यांमध्ये चिखल हा प्रमुख घटक आहे. घरटे बांधण्याची जागा आणि साहित्य वेगवेगळे असले तरी उद्देश एकच - पिल्लांसाठी सुरक्षित निवारा. एक पक्षी झाडाच्या फांदीचा आधार घेतो, तर दुसरा दगडी वास्तूचा आधार घेत चिखलाचे घरटे उभारतो.
---
निसर्गाशी जुळवून घेण्याचा सुंदर नमुना
माणसाने उभारलेल्या दगडी वास्तूमध्येही पक्ष्यांनी सुरक्षित अधिवास शोधून काढल्याचे हे उदाहरण आहे. पाण्याची उपलब्धता, संरक्षित दगडी छत आणि मानवी हस्तक्षेपापासून तुलनेने सुरक्षित जागा यामुळे येथे पक्ष्यांची वसाहत निर्माण झाली आहे. विष्णुपद मंदिरातील ही घरटी नदी, दगडी वास्तू आणि पक्षिजीवन यांच्यातील निसर्गसाखळीचे सुंदर दर्शन घडवितात. ही घरटी जतन करण्याबरोबरच भाविक व पर्यटकांनी पक्ष्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे.
---
कोट
PNE26W50020
आभोळी व भिंगरी पक्ष्यांची घरटी बांधण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे. नदीकाठच्या मऊ मातीत लाळ मिसळून सिमेंटसारखा चिवट चिखल तयार करून ते भिंतीवर लिंपतात. निघोजच्या रांजणखळग्यांसह नीरा नदीच्या खडकाळ पात्रात अशी घरटी वर्षानुवर्षे दिसतात. पंढरपुरात भाविकांची गर्दी असूनही हे पक्षी धीटपणे घरटी साकारतात.
- डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.