‘गोऱ्हे बुद्रुक’ने जपला भूमातेच्या रक्षणाचा वारसा

Tukaram-bajirao-Madhukar
Tukaram-bajirao-Madhukar

खडकवासला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या गावाने भूमातेच्या रक्षणाचे काम केले ते गोऱ्हे बुद्रुक आज सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. गावात सध्या १५ माजी सैनिक असून, १५ सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करून इतिहास घडवत आहेत. अशा या सैनिकांच्या गावाचा स्वातंत्र्य दिनानिमित्त (ता. १५) घेतलेला आढावा.

तुकाराम कृष्णा खिरीड - देशात स्वातंत्र्यानंतर मुख्य घटना घडल्या त्यातील तीन घटनांचे साक्षीदार असलेले तुकाराम खिरीड हे नोव्हेंबर १९६२ मध्ये सैन्यात भरती झाले. सुरवातीला जम्मू काश्‍मीरच्या पठाणकोटमध्ये पोस्टिंग झाले. पाकिस्तानबरोबर १९६५च्या युद्धात ते पोखरण येथे तैनात होते. या वेळी ते २५ फाउंडर गन चालवायचे. मुख्य सीमेपासून आठ ते नऊ किलोमीटर लांब होते. ते युद्ध आपण जिंकले. बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा ते बांगलादेशला होते. तेथे त्यांनी साध्या वेशात सैन्यदलाचे शांतीदूत म्हणून काम केले. इलाहाबाद येथे ब्लू स्टार ऑपरेशनमध्येदेखील सहभागी होते. लान्स नाईक, नाईक, बीएचएम, आरएचएम, नाईक सुभेदार आणि सुभेदार अशा पदोन्नती त्यांना मिळाल्या. 

बाजीराव बाबूराव खिरीड - १९८२ मध्ये मेकॅनिक रेजिमेंटमध्ये सहभागी झाले. त्यांना रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण अहमदनगर येथे देण्यात आले. त्यांची पटियाला, नाभा, लेह लडाख, अंबाला, पोखरण येथे सेवा झाली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती व तत्कालीन संरक्षण सल्लागार डॉ. अब्दुल कलाम यांनी १९९८ मध्ये पोखरण अणुचाचणी केली. या वेळी ऑपरेशन पराक्रम या नावाने युद्धाची तयारी सुरू होती. रणगाडे सीमेवर तैनात होते. अनुचाचणी झाली; परंतु युद्ध मात्र झाले नाही. २००० ते २००२ यातील काही महिने त्यांचा मुक्काम सीमेवर होता. सुरतगड, नशिराबाद आणि राजस्थान अशा वाळवंटाच्या प्रदेशात ते होते.

मधुकर बाबूराव खिरीड - मार्च १९६७ मध्ये चालक (डीएसव्ही) म्हणून ते रुजू झाले. त्यांना दुचाकीपासून रणगाड्यांपर्यंत सर्व वाहने चालवण्याचे प्रशिक्षण नाशिक येथे मिळाले. बेळगाव १९६८ ला ते ३४ मराठा मीडियम रेजिमेंट सहभागी झाले. कबड्डी आणि बॉक्‍सिंगमध्ये ते अव्वल स्थानावर होते. आम्ही मराठा रेजिमेंटमध्ये होतो. अनेक रणगाड्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र होते, त्यामुळे मोठी ऊर्जा मिळायची. बांगलादेश निर्मितीच्या १९७१ मध्ये आम्ही अमृतसर सेक्‍टरमध्ये होतो. त्या वेळी पाकिस्तानमधील सियालकोट म्हणजे ६७ किलोमीटर अंतर पार केले होते. जम्मू-काश्‍मीर उद्यमपूर येथे कारवा येथील पूल तयार करण्यासाठी सैन्याची मदत घेतली होती. सध्या सैन्य दलात असलेले विजय नानगुडे हे युनोच्या माध्यमातून शांतिदूत म्हणून दक्षिण आफ्रिकेत आहेत. दीपक भोरडे कारगिल युद्धात सहभागी झाले होते. कानाजवळून गोळी गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com